रेशनिंग दुकानात मास्क आणि सॅनिटायझर उपलब्ध करण्याची मागणी
पनवेल : रामप्रहर वृत्त
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या कामोठे, कळंबोली आणि खारघर मंडलच्या पदाधिकार्यांच्या वतीने रेशनिंग दुकानात फेस मास्क आणि सॅनिटायझर उपलब्ध करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात तहसीलदारांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले आहे. भाजप पदाधिकार्यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा प्रसार अत्यंत वेगवान गतीने होत आहे. यासाठी प्रत्येक नागरिकाने सुरक्षेच्या दृष्टीने मास्क घालणे व वारंवार आपले हात स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे पनवेल तालुक्यात मास्क आणि सॅनिटायझरचा तुटवडा जाणवत आहे. पनवेल तालुक्यातील लोकसंख्येनुसार मास्क आणि सॅनिटायझरची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे शासनामार्फत रेशनिंग दुकानात मास्क आणि सॅनिटायझर उपलब्ध करून द्यावेत. सामान्य नागरिकांचा विचार करून शासनाने मास्क आणि सॅनिटायझर उपलब्ध करण्याच्या मागणीचा विचार करावा. या वेळी तहसीलदारांना निवेदन देताना भारतीय जनता पक्ष कामोठे मंडल अध्यक्ष रवींद्र गणपत जोशी, कळंबोली मंडल अध्यक्ष रविशेठ पाटील, खारघर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल आदी पदाधिकारी उपस्थित होते.