Breaking News

सावळ्यातील फार्म हाऊस सोसायटीमधील पाणीपुरवठा आणि वीज कोरोनामुळे कापली प्रशासन धावले मदतीला

कर्जत : बातमीदार  : तालुक्यातील सावळा येथे 40 वर्षांपूर्वी फार्म हाऊस सोसायटी उभी राहिली. या फार्म हाऊसचे बहुतेक मालक सध्या तेथे राहून आहेत. कोणी अज्ञात लोकांनी या सोसायटीची वीज तोडली, त्या ठिकाणी जाणारे रस्ते बंद केले आणि तेथील पाणीपुरवठाही बंद केला होता. दरम्यान, तहसीलदार आणि पोलीस उपअधीक्षकांनी त्या ठिकाणी जाऊन पुढाकार घेऊन सर्व व्यवस्था सुरळीत केली.

सावळा येथील फार्म हाऊस सोसायटी कर्जत तालुक्यातील सर्वात जुनी असून त्या ठिकाणी जवळपास 50 फार्म हाऊस आहेत. मुंबईतील कवी, लेखक, पत्रकार, क्रिकेटर, उद्योजक असे नामांकित त्या फार्म हाऊस सोसायटीत विकेण्डला येतात आणि राहतात. या फार्म हाऊसमध्ये काम करणारे सर्व कामगार हे जवळच्या सावळा आणि हेदवली गावातील तरुण काम करतात. ही सोसायटी जुनी असल्याने आणि खालच्या बाजूने पेजनदी वाहत असून त्या ठिकाणी त्या फार्म हाऊस मालकांनी नळपाणी योजना तयार केली होती. त्या सोसायटीत मागील काही दिवसांपासून त्या घरांचे मालक मुंबईत कोरोनाची लागण होऊ नये यासाठी येऊन राहिले आहेत. हीच बाब काही लोकांना खटकली आणि त्यांनी त्या सर्व फार्म हाऊस मालकांनी मुंबईत आपल्या घरी राहायला जावे असे सूचित करण्याचा प्रयत्न केला, परंतु आपल्यापैकी कोणालाही कोरोनाची लागण झाली नसून आपण नेहमीप्रमाणे विश्रांतीसाठी येथे आलो असल्याचे सांगून तो विषय टाळत होते.

अखेर 24 मार्चच्या रात्री सावळा सोसायटीला येणारी वीज अज्ञात लोकांनी तोडून टाकली. त्याचवेळी या सोसायटीला येणारा नळपाणीपुरवठाही तोडून टाकण्यात आली. त्यानंतर तेथे येणारे रस्ते दगड टाकून अडवून टाकण्याचे काम अज्ञात लोकांनी केले. त्यामुळे तेथील फार्म हाऊस मालक घाबरून गेले. या सोसायटीत फार्म हाऊस असलेले राज्यसभेचे माजी सदस्य व ज्येष्ठ पत्रकार यांनी पोलिसांच्या कानावर ही माहिती दिली. त्यानंतर बुधवारी सकाळी कर्जतचे तहसीलदार विक्रम देशमुख आणि पोलीस उपअधीक्षक अनिल घेरडीकर हे प्रशासन सोबत घेऊन सावळा येथे पोहोचले. तेथे त्यांनी सर्व फार्म हाऊसमध्ये फिरून आपल्यासोबत असलेल्या आरोग्य पथकाकडून तपासणी करून घेतली. साधारण 15 फार्म हाऊसमध्ये येऊन राहणार्‍यांपैकी एकालाही कोरोनाचा संसर्ग झाला नाही हे सिद्ध होताच तहसीलदारांनी सावळा गावातील ज्येष्ठ लोकांना तेथे बोलावून घेतले आणि त्यांना फार्म हाऊसमध्ये राहणार्‍यांबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यांनतर फार्म हाऊसची वीज, पाणी पूर्ववत करून रस्त्यावर टाकलेले दगड बाजूला काढण्यात आले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply