Breaking News

रायगडात शेती, मनरेगालाच मुभा

अन्य कामे, व्यवहारांवर बंदी कायम : जिल्हाधिकारी

अलिबाग : प्रतिनिधी
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेली 3 मेपर्यंतची टाळेबंदी (लॉकडाऊन) रायगड जिल्ह्यात सुरूच राहणार आहे. जिल्ह्यातील एमएमआरडीए क्षेत्रातील सहा तालुके तसेच नऊ कंटेन्मेट झोनमधील व्यवहारांवर असलेली बंदी कायम असणार आहे, परंतु शेतीची कामे व महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची (मनरेगा) कामे सुरू राहतील, असे रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सोमवारी (दि. 20) जाहीर केले.
टाळेबंदीसंदर्भात महिती देण्यासाठी नियोजन भवन सभागृहात अयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी चौधरी बोलत होत्या. पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकरी दिलीप हळदे, जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके, अप्पर जिल्हाधिकारी भरत शितोळे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश खोपकर, शीतल पुंड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद गवई सोबत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाळेबंदीचा कालावधी 3 मेपर्यंत वाढविला. त्याचवेळी 20 एप्रिलपर्यंत परिस्थिती पाहून काही ठिकाणी टाळेबंदी शिथिल करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले होते. रायगड जिल्ह्यात पनवेल महापालिका तसेच या तालुक्याच्या काही भागत कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहेत. उरण तालुक्यातही कोरोना रूग्ण आढळले. त्यामुळे पनवेल व उरण तालुका वगळून उर्वरित जिल्ह्यात टाळेबंदी शिथिल केली जाईल, अशी रायगडकरांना अपेक्षा होती, मात्र ती फोल ठरली आहे.
रायगड जिल्हा मुंबईपासून खूपच जवळ आहे. त्यामुळे या जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात होती, परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणवर होण्यापासून रोखण्यात आम्हाला यश आले आहे. जिल्ह्यात 49 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार होण्याचा वेगदेखील कमी आहे. असे असले तरी जिल्ह्यातील एमएमआरडीए क्षेत्रात असलेले पनवेल, उरण, अलिबाग, पेण, खालापूर व कर्जत हे सहा तालुके तसेच जे भाग कंटेन्मेट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत तेथे टाळेबंदी कायम राहणार आहे, असे जिल्हाधिकार्‍यांनी या वेळी स्पष्ट केले.
मुंबई, पुण्यातून जे आलेत त्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. याचा अर्थ ते सर्व कोरोना पॉझिटीव्ह आहेत असा होत नाही. त्यामुळे लोकांनी घाबरू नये. सर्वांनीच खबरदारी घ्यावी. प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकार्‍यांनी केले.
माहिती लपवणार्‍यांवर कारवाई करणार
22 मार्चपासून टाळेबंदी जाहीर करण्यात आली होती. तेव्हापासून मुंबई, ठाणे, पुणे या शहारातून लोक वेस ओलांडून रायगड जिल्ह्यात आले. त्या सर्वांची माहिती घेण्यात आली आहे. त्यांना कॉरेंटाईन करण्यात आले होते. 22 मार्चासून जे आलेत त्यांचा क्वारंटाइनचा 28 दिवसांचा कालावधी संपला आहे. 1 एप्रिलनंतर आलेत त्यांचे 20 दिवस झाले आहेत. 1 एप्रिलनंतर आले आहेत त्यांना क्वारंटाइनमध्ये राहण्यास सांगण्यात आले आहे. त्यांच्यावर  आरोग्य विभागाची नजर आहे. ज्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहेत त्यांनी घरातून बाहेर पडू नये. जे बाहेर पडतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. परजिल्ह्यातून आलेल्यांची  माहिती लपविणार्‍यांवरही भारतीय दंड संहिता कलम 144 नुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी या वेळी दिला.

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply