Breaking News

निसर्ग चक्रीवादळाचा रायगडला तडाखा

  • जिल्ह्यात अनेक ठिकाणी पडझड
  • मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान

अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात कोरोनाचे संकट वाढत असतानाच बुधवारी (दि. 3) जिल्ह्याला निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला. सोसाट्याच्या वार्‍यामुळे ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली. घरांची छपरे उडाली. त्यामुळे मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. झाडे रस्त्यावर पडल्याने काही ठिकाणची वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. या वादळाने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले. 
निसर्ग चक्रीवादळ बुधवारी अलिबागला धडकणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला होता. दुपारी 12 वाजता वादळ अलिबागला पोहोचल असे सांगण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर सकाळी 6.30 वाजल्यापासून वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. सकाळी 7 पासून पाऊस पडण्यास सुरुवात झाली. 11पासून वार्‍याचा वेग वाढला. दुपारी 1 वाजता प्रचंड वेगाने वारे वाहू लागले. त्यामुळे झाडे रस्त्यांवर उन्मळून पडून वाहतूक बंद झाली.
वादळाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या घरात राहणार्‍या सुमारे 13 हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले होते. त्यामुळे जीवित हानी टळली. दुपारी 3 वाजल्यापासून वार्‍याचा वेग कमी झाला, पण तत्पूर्वी वादळी पावसाने जिल्ह्याला झोडपडून काढले. श्रीवर्धन, मुरूड, रोहा, अलिबाग, उरण व पेण या तालुक्यांना वादळाचा सर्वाधिक तडाखा बसला.
अलिबागमध्ये एकाचा मृत्यू
निसर्ग चक्रीवादळामुळे अलिबाग तालुक्यात एक बळी गेला असून, एकजण जखमी झाला आहे. उमटे बंगलेवाडी येथे विद्युत खांब पडून दशरथ बाबू वाघमारे (वय 58) जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, तर रामराज येथे विद्युत खांब पडून एक व्यक्ती जखमी झाली आहे. या व्यक्तीला वैद्यकीय उपचारासाठी मदत पोहोचविण्यात आली असल्याचे जिल्हा व्यवस्थापनाकडून कळविण्यात आले.
पनवेल, उरण तालुक्यांनाही फटका
पनवेल, उरण : निसर्ग चक्रीवादळाचा फटका पनवेल आणि उरण तालुक्यांनीही बसला. जोरदार वारे वाहत असल्याने झाडे उन्मळून पडली. पनवेल तालुक्यातील काही गावांत घरांची छप्पर उडून नुकसान झाले. उरण तालुक्यात अनेक नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. वादळामुळे विजेचे खांब पडण्याची, विद्युतवाहिन्या तुटण्याची शक्यता असल्याने महावितरणने खबरदारीचा उपाय म्हणून वीजपुरवठा खंडित केला होता. दूरध्वनी, मोबाइल सेवेवरही परिणाम दिसून आला.
रोह्यात वाताहत
रोहे : रोहे शहरासह तालुक्यात निसर्ग चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात पडझड होऊन नुकसान झाले आहे. रोह्यात सकाळी 10 वाजल्यापासून वादळी वार्‍यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे अनेक ठिकाणी घरावरील पत्रे व कौले उडाली, तर झाडे कोसळली. तालुक्यात रोहा शहरासह नागोठणे, कोलाड, चणेरा, मेढा, घोसाळे यशवंतखार
आदी भागात जनजीवन विस्कळित झाले आहे.
नागोठणेकरांनी अनुभवला थरार
नागोठणे : निसर्ग चक्रीवादळाचा अनुभव नागोठण्यातील नागरिकांनी बुधवारी दुपारी 12.30 ते 1.45 दरम्यान अनुभवला. सव्वा तासाने त्याचा ओसरला, मात्र विश्रांतीनंतर पुन्हा वादळाला प्रारंभ झाल्याने सुटका झाली या अविर्भावात असणार्‍या नागरिकांचे पुन्हा एकदा धाबे दणाणले.
निसर्ग चक्रीवादळ येणार असल्याने सकाळपासून पाऊस पडत होता. अखेर दुपारी 12.30च्या सुमारास चक्रीवादळाने नागोठण्यात थैमान घालवायचा सुरुवात केली. वार्‍याचा वेग प्रचंड असल्याने अनेक इमारतींवरील शेडचे पत्रे तसेच अनेकांच्या घरांवरील कौले, पत्रे उडाले असल्याचे समजते. काही ठिकाणी झाडे पडली असून, विद्युत खांब जमीनदोस्त झाले आहेत. कोठेही जीवितहानी झाली नसल्याचे पोलीस सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले.
विभागातील अनेक गावांनासुद्धा या वादळाचा फटका बसून अनेकांच्या घरांवरील पत्रे, कौले जमीनदोस्त झाली आहेत, तर नागोठणे ते रिलायन्स कंपनी, कुहिरे मार्गावर अनेक ठिकाणी झाडे पडल्याने नागोठणे-शिहू मार्ग वाहतुकीस बंद झाला. दरम्यान, दुपारी 3 नंतर या वादळाने पुन्हा एकदा रौद्र रूप धारण केले.

Check Also

उलवेतील रामशेठ ठाकूर मैदानावर कबड्डीचा थरार!

पनवेल ः रामप्रहर वृत्तसंघभावना, अचूक रणनीती, वेगवान चढाया आणि बचावातील नियंत्रण यांचा रोमांचक संगम उलवे …

Leave a Reply