रेवदंडा : प्रतिनिधी
निसर्ग चक्रीवादळामुळे रेवदंडा, चौल, नागाव परिसरात घरांसह नारळ व सुपारीच्या बागा, तसेच आमराईचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून राज्य शासनाने वादळग्रस्तांना लवकरात लवकर मदत करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
हवामान खात्याने दिलेल्या चक्रीवादळाच्या पूर्वसूचनेनुसार संचारबंदी घोषित करण्यात आली होता. समुद्र किनारी घरे असलेल्या ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले होते. विद्युुत पुरवठा बंद करण्यात आला होता. तरीही चक्रीवादळाच्या प्रकोपापासून वाचता आले नाही. रेवदंडा परिसरात जीवित नाही झाली नाही, मात्र मोठी वित्त हानी झाली आहे. अनेकांच्या घरावरील कौले, पत्रे जोरदार वार्याने उडून गेली. विशेष म्हणजे रेवदंडा-चौलची शान असलेल्या नारळ व सुपारीच्या बागा तसेच परिसरातील आमराई यांना तडाखा बसला आहे. चक्रीवादळाचा जोर न सोसल्याने बागायतीतील माडे व सुपारी वृक्ष तुटून पडले, तर आमराईतील आंब्याची झाडे, फांद्या उन्मळून पडल्या. त्यामुळे बागायतदारांना फटका बसला आहे.
चक्रीवादळामुळे विद्युत तारा, खांब तुटून पडले असून, रेवदंडा, चौल व नागावमधील मुख्य रस्ता बंद पडला आहे. याचप्रमाणे गल्लोगल्लीतील रस्ते झाडे पडल्याने बंद झाले आहेत. चक्रीवादळाचा जोर संपल्यानंतर ग्रामस्थ घराच्या बाहेर येऊन नुकसानीचा अंदाज घेऊ लागले. अनेकांनी स्वतः परिश्रम घेऊन रस्त्यात पडलेले वृक्ष, फांद्या तसेच ठिकठिकाणी पडलेले घराची कौले, पत्रे बाजूला करण्यासाठी श्रमदान सुरू केले.