Breaking News

गरूडझेप फाऊंडेशनचे विद्यार्थ्यांना ऑफलाइन शिक्षण

रोहे ः प्रतिनिधी

रोहा तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील चिंचवली तर्फे आतोणे जिल्हा परिषदेच्या शाळेतील 63 गरीब आदिवासी विद्यार्थ्यांना कोरोना काळात शिक्षण मिळावे म्हणून अभ्यासिका उपलब्ध करून देऊन गरूडझेप फाऊंडेशनने समाजकार्याचे एक आगळेवेगळे पाऊल टाकले आहे. रोह्यापासून 25 किमी अंतर असलेल्या दुर्गम भागातील शाळेत हा उपक्रम राबविण्यात आला आहे. जूनला नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली, पण शाळा किमान सप्टेंबरपर्यंत तरी उघडणार नाहीत. सर्वत्र ऑनलाइन शिक्षणाचा प्रसार सुरू असताना ज्या ठिकाणी ऑनलाइन शिक्षण शक्य नाही अशा ठिकाणच्या मुलांसाठी हे पाऊल महत्त्वाचे आहे.

चिंचवली शाळेतील सर्व 63 मुलांचे पालक मोलमजुरी करतात. त्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाइल नाही किंवा ऑनलाइनचे कुठलेच साधन नाही. तसेच आर्थिक परिस्थितीमुळे मुलांना साहित्य घेणेही शक्य नव्हते. अशा वेळी शाळेतील शिक्षकांनी तयार केलेल्या अभ्यासिकेला गरूडझेप फाऊंडेशनने मदतीचा हात देत छपाई व लेखन साहित्याची मदत केली.

गरूडझेप फाऊंडेशनचे अध्यक्ष दुर्गेश नाडकर्णी, सचिव केदार आमरे, उपाध्यक्ष यतीन धुमाळ, खजिनदार दत्ता साळुंखे यांच्या मदतीने तयार झालेल्या पुस्तिकेचे वाटप मुख्याध्यापक गजानन जाधव व उपशिक्षक जगन्नाथ अब्दागिरे यांनी केले. मुलांच्या बेसिक ज्ञानाचा विचार करून ही पुस्तिका बनविली आहे. त्याचा सराव कसा करावा याचे मार्गदर्शन मुलांना शिक्षकांच्या मदतीने करण्यात आले असून जिथे ऑनलाइन शिक्षण शक्य नाही अशा ठिकाणी हा ऑफलाइन प्रयोग यशस्वी होत आहे.

गरूडझेप फाऊंडेशनच्या माध्यमातून 2011पासून आम्ही गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत करीत आहोत. सध्या लॉकडाऊन असल्याने शाळा बंद आहेत व प्रत्येक ठिकाणी ऑनलाइन शिक्षण शक्य नसल्याने अशा गरजू मुलांच्या शिक्षणासाठी आमच्या गरूडझेपकडून केलेली ही छोटीशी मदत आहे.-दुर्गेश नाडकर्णी, अध्यक्ष, गरूडझेप फाऊंडेशन, रोहा

Check Also

उलवे नोडमध्ये रविवारी महासंस्कृती : जागर स्त्री शक्तीचा सांस्कृतिक कार्यक्रम

भजनी मंडळांना भांडवली अनुदानाचे होणार वाटप पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि …

Leave a Reply