Breaking News

वाढीव वीज बिल आकारणीविरोधात आज टाळेबंद आंदोलन

पनवेल : रामप्रहर वृत्त
लॉकडाऊन काळात वीज ग्राहकांवर अन्यायकारक बिले लादण्यात आलेली आहेत. राज्य शासन व विद्युत मंडळाच्या या मनमानी कारभाराविरोधात भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली युवा मोर्चाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या पनवेल-भिंगारी येथील कार्यालयासमोर मंगळवारी (दि. 4) सकाळी 11 वाजता टाळेबंद आंदोलन करण्यात येणार आहे. आकारलेल्या विजेच्या जाचक बिलांची पडताळणी करून सुधारित वीज बिले नागरिकांना मिळावीत, अशी आंदोलनकर्त्यांची मागणी आहे.
कोरोनाच्या संकटकाळात रीडिंग न घेता सरसकट तीन-चार महिन्यांचे वीज बिल पाठविल्याने तसेच आकारण्यात आलेल्या अतिरिक्त वीजभारामुळे अचानक अधिक बिल आल्याने पनवेलमधील नागरिक हैराण झाले आहेत. भरमसाठ बिले न भरल्यास वीजपुरवठा खंडित होण्याची भीतीही निर्माण झाली आहे.
अतिरिक्त विद्युत भार, वाढीव बिले, घर बंद असूनही आलेले बिल व इतर तांत्रिक विषयांवर भाजप पदाधिकार्‍यांकडे नागरिकांनी अनेक तक्रारी केल्या आहेत. यासंबंधी स्थानिक विद्युत मंडळाच्या अधिकार्‍यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी ज्या तक्रारदारांची पत्रे प्राप्त झाली आहेत त्यांचा वीजपुरवठा पडताळणी होईपर्यंत खंडित होणार नाही, असे आश्वासनदेखील दिले होते, परंतु कुठल्याही प्रकारची कार्यवाही होत नसल्याने पनवेलच्या जनतेचा रोष वाढतच आहे.
कोरोनाच्या महामारीत अनेकांच्या नोकर्‍या गेल्या आहेत. त्यामुळे पगार नाही व पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा वेळी जाचक वीज बिलांचा भार नागरिकांच्या माथी मारण्याचे काम विद्युत मंडळाकडून केले जात आहे. त्यावर महाविकास आघाडी सरकार मूग गिळून शांत बसले आहे. त्याचा निषेध करून वीज ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. यामध्ये योगदान द्यावे, असे आवाहन भाजप युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांनी केले आहे.

Check Also

अजितदादांच्या निधनाने कबड्डी खेळाचे मोठे नुकसान -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्तमातीतल्या खेळांपैकी एक कबड्डीचा आधारस्तंभ असलेले अजितदादा पवार यांच्या निधनामुळे या खेळाचे …

Leave a Reply