पनवेल : बातमीदार
खासगी वाहनातून जिल्ह्याबाहेर प्रवास करणार्यांना ई-पास अजूनही बंधनकारक आहे. मात्र अनेकांच्या पदरी निराशा पडत आहे. कागदपत्रांचा अभाव, वैद्यकीय प्रमाणपत्र नसणे, अपूर्ण माहिती यामुळे ई-पास नाकारले जात आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात आतापर्यंत सात लाख 46 हजार 142 जणांनी ई-पासची मागणी केली होती, मात्र केवळ दोन लाख 27 हजार 988 जणांना पास देण्यात आले आहेत. त्यामुळे तब्बल पाच लाख ई-पास अर्ज नाकारले आहेत. ई-पासची सक्ती, तसेच भरमसाठ नियमानुसार अर्ज स्वीकारत असल्याने राज्य शासनाविरोधात नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप कायम आहे. त्यामुळे राज्य सरकारने जिल्ह्याबाहेर खासगी वाहनाने प्रवास करताना ई-पासची सक्ती कायम ठेवली आहे. ई-पासच्या मंजुरीसाठी कोविड 19 या संकेतस्थळावर जाऊ न अर्ज केल्यानंतर संबंधित विभागातील पोलिसांकडून तो अर्ज मंजूर केला जातो.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय विभागाने 1 मेपासून ई-पास देण्यासाठी परिमंडळ एक आणि दोन हे वेगवेगळे भाग केले आहेत. त्यानुसर 23 मार्च ते 1 मेपर्यंत नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील नवी मुंबई, पनवेल व उरण परिसरांतील दोन लाख 92 हजार 403 रहिवाशांनी ई-पाससाठी अर्ज केले होते. पैकी 81 हजार 894 रहिवाशांना मंजुरी देण्यात आली होती, तर एका पासबाबत निर्णय (पेंडिंग) झाला नव्हता. 1 मे नंतर परिमंडळ एक मध्ये दोन लाख 48 हजार 184 जणांनी अर्ज केले होते, पैकी 86 हजार 738 जणांचा अर्ज मंजूर झाले होते, तर 1 लाख 61 हजार 353 जणांना परवानगी नाकारण्यात आली होती. 93 अर्जाबाबत निर्णय झाला नव्हता. परिमंडळ दोन मध्ये 1 मे नंतर एक लाख 88 हजार 782 रहिवाशांनी ई-पास साठी अर्ज केला होता, त्यापैकी एक लाख 34 हजार 279 बाद ठरले होते, तर 54 हजार 404 जणांना परवानगी देण्यात आली होती व 99 अर्ज प्रलंबित होते. 23 मार्च ते 27 ऑगस्टदरम्यान एकूण 561 अर्ज प्रलंबित राहिले आहेत. यात 1 मे पूर्वी 368 अर्ज प्रलंबित आहेत.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातून 27 ऑगस्ट दुपारी 2 वाजेपर्यंत एकूण सात लाख 46 हजार 142 जणांनी ई-पासची मागणी केली आहे. मात्र ई-पास देताना असलेल्या नियमात जे पात्र होतात त्यांनाच परवानगी देण्यात येत असल्याने केवळ दोन लाख 27 हजार 988 नवी मुंबईकरांना ई-पास देण्यात आलेले आहे.
ई-पास देण्यासाठी नियमावली ठरवण्यात आली होती. कोरोनाव्यतिरिक्त अन्य रोगाने नातेवाइकाचे निधन झाले, कोणाचे जवळचे नातेवाइक अत्यवस्थ आहेत, स्वत:चा किंवा अति निकट नातेवाईकाचा विवाह आहे, आदी करणाव्यतिरिक्त जीवनावश्यक वस्तूंचे वहन करणार्यांनाच ई-पास देण्यात येतात. मात्र अनेकदा अत्यावश्यक कारण नसताना अर्ज केले जातात. अत्यावश्यक काम कागदपत्र देण्यात येत नाहीत, अशा विविध तांत्रिक कारणांनी ई-पासची परवानगी नाकारली जाते.
– प्रवीणकुमार पाटील, उपयुक्त गुन्हे शाखा