कर्जत : बातमीदार
नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व तेथील कर्मचार्यांच्या हलगर्जीपणामुळे नेरळ जवळील पिंपळोली गावात माहेरवासीण असलेल्या महिलेला बाळंतपणानंतर आपला आणि नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमवावे लागले आहे.
पूनम राजेंद्र रुठे या गरोदर असल्याने त्यांना पहिल्या गरोदरपणासाठी पिंपळोली या गावी माहेरी आणण्यात आले होते. नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दैनंदिन तपासणी करणार्या पूनम यांना बाळंतपणासाठी रविवारी (दि. 4) पहाटे पिंपळोली गावातून रिक्षाने नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. रात्रीच्या वेळी डॉ. महेंद्र धाडवड यांची ड्युटी होती, मात्र ते प्राथमिक आरोग्य केंद्रात उपस्थित नसल्याने ड्युटीवर असलेल्या निवासी आरोग्यसेविका संगीता सरोदे यांनी पहाटे चार वाजता पूनम रुठे यांना तपासले आणि सकाळपर्यंत बाळंतपण होईल असे सांगितले. त्यानंतर सकाळी सात वाजता पूनम राजेंद्र रुठे या बाळंत झाल्या आणि त्यांच्या पोटी मुलगा जन्माला.
बाळ हे गुदमरलेले असल्याने बालरोगतज्ज्ञ यांच्याकडून उपचार घ्या अशी सूचना आरोग्यसेविका सरोदे यांनी केली. बाळाला त्या खासगी रुग्णालयात घेतले नसल्याने कर्जत उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. कर्जत उपजिल्हा रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ असतानादेखील बाळाची तपासणीदेखील केली नाही आणि पनवेल कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात पाठवून देत आपली जबाबदारी झटकली. पनवेल येथे जात असताना अकराच्या सुमारास बाळाचा मृत्यू झाला.
तिकडे नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात बाळंतपण झालेल्या माता पूनम रुठे यांच्या शरीरातून होणारा रक्तस्त्राव बाळंतपण होऊन दोन तास झाले तरी थांबत नव्हता. त्यामुळे आरोग्यसेविका सरोदे यांनी जबाबदारी ढकलत पूनम यांना नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेतून कर्जत उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिले. कर्जत उपजिल्हा रुग्णालयाने त्यांना दाखल करून घेण्यास नकार दिला. त्यामुळे पनवेल कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात नेण्यात येऊ लागले. मात्र एमजीएम रुग्णालयात नेले जात असताना पूनम यांचा मृत्यू झाला.
नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या चुकीच्या आरोग्य व्यवस्थेमुळे आई व बाळाला जीव गमवावा लागला आहे. ऑनड्युटी असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र धाडवड हे प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहचले नाहीत.
त्या महिलेचे बाळंतपण हे नॉर्मल झाले होते. त्यामुळे आपण बाळंतपण आणि बाळ यांना सुखरूप सोडवले होते, पण बाळ गुदमरलेले असल्याने आणि बाळाच्या आईच्या शरीरातील रक्तस्त्राव थांबत नसल्याने आपण दोघांना व्यवस्थित करण्याचा प्रयत्न शेवटपर्यंत करीत होतो.
-संगीता सरोदे, आरोग्यसेविका
RamPrahar – The Panvel Daily Paper