Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून पवार कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत सुपूर्द

दिवंगत पत्रकार संतोष पवार यांना कोरोना योद्धा जाहीर करावे; आमदार प्रशांत ठाकूर यांची राज्य शासनाकडे मागणी

कर्जत : बातमीदार
रायगड जिल्ह्यातील माथेरान येथील ज्येष्ठ पत्रकार संतोष पवार यांचे 9 सप्टेंबर रोजी निधन झाल्यानंतर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी संतोष पवार यांच्या कुटुंबाला पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली होती. या मदतीचा धनादेश भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी (दि. 5) नेरळ येथे येऊन पवार कुटुंबीयांकडे सुपूर्द केला. संतोष पवार हे कोविड काळातदेखील काम करीत होते. त्यामुळे त्यांचा झालेला मृत्यू लक्षात घेऊन त्यांना राज्य शासनाने कोरोना योद्धा म्हणून जाहीर करावे आणि विमा कवचचा लाभ द्यावा, अशी मागणी या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली तसेच यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.
संतोष पवार यांच्या नेरळ येथील घरी सोमवारी आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह मुंबई मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष तथा दैनिक रामप्रहरचे मुख्य संपादक देवदास मटाले, मुंबई मराठी पत्रकार संघाचे माजी कोषाध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार दीपक म्हात्रे, भाजपचे कर्जत तालुका सरचिटणीस राजेश भगत आदी उपस्थित होते. या वेळी दिवंगत संतोष पवार यांच्या पत्नी मनीषा, पुत्र मल्हार, मुलगी मृण्मयी आणि सासरे यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांत्वन केले तसेच संतोष पवार यांच्या अनेक आठवणींना उजाळाही दिला. जवळचे स्नेही आणि राजकीय वातावरणात निर्माण होणार्‍या नवनवीन बदलांबद्दल नेहमी आपुलकीने बोलणारे व्यक्तिमत्व आपल्यातून गेल्याचे दुःख आहे, असे ते म्हणाले. मल्हार पवार याने कोणतीही मदत लागल्यास हक्काने आपल्याला हाक मारावी, असे आवाहनही त्यांनी केले.
विधिमंडळात आवाज उठविणार
या वेळी मल्हार संतोष पवार याने वडिलांच्या मृत्यूस आरोग्य यंत्रणेची चुकीची कार्यपद्धती जबाबदार आहे. कारण वडिलांना नेरळ येथून कर्जतला नेण्यापासून पनवेलला हलवित असताना मी सोबत होतो. आरोग्य विभागाचा हलगर्जीपणा मी स्वतः माझ्या वडिलांसोबत झाला असल्याचे पाहिले आहे. त्यामुळे माझ्या वडिलांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या सर्वांवर कारवाई व्हावी आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करणारे निवेदन मल्हारने सादर केले. त्यावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपण या प्रकरणात आरोग्य यंत्रणा सदोष होती हे स्वतः पाहिले असल्याने दिवंगत संतोष पवार यांना न्याय मिळवून देण्यासाठी विधिमंडळात आवाज उठवू, असे आश्वासन दिले.
दरम्यान, शासनाने जाहीर केल्याप्रमाणे दिवंगत संतोष पवार यांच्या कुटुंबाला विमाकवच आणि मदत मिळावी यासाठी राज्यातील विरोधी पक्षाचे आमदार म्हणून प्रयत्न करावेत या मागणीचे निवेदन कर्जत तालुक्यातील पत्रकारांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना दिले. आपण उद्या रायगड जिल्हाधिकारी यांना पत्र लिहून संतोष पवार यांना कोरोना योद्धा जाहीर करावे आणि त्यांना शासनाच्या विमाकवचचा लाभ देण्याची मागणी करणार असल्याचे आमदार ठाकूर यांनी सांगितले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply