अलिबाग : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य सेवा परीक्षा रद्द कराव्यात, पोलीस भरती प्रक्रिया थांबवावी, 2020-21 या शैक्षणिक वर्षात एसइबीएस प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक संरक्षण करावे या मागण्यांसाठी सकल मराठा समाजातर्फे शुक्रवारी (दि. 9) रायगड जिल्हाधिकारी कार्यालायासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
मराठा क्रांती मोर्चाचे रायगड जिल्हा समन्वयक विनोद साबळे, कर्जतचे माजी नगराध्यक्ष राजेश लाड, खोपोलीच्या उपनगराध्यक्ष विनिता कांबळे, माजी नगराध्यक्ष सुनील पाटील, रोह्यातील प्रदीप देशमुख, विजय मोरे, चंद्रकांत पार्टे, नीलेश शिर्के, सूर्यकांत मोरे, सुहास येरुणकर, जीवन देशमुख, अमोल देशमुख, शशिकांत मोरे, दिनेश पाशिलकर, संकेत देशमुख, पेणचे मंगेश दळवी, अलिबाग तालुका अध्यक्ष नरेश सावंत, राजेश कडू, सोमनाथ ठोंबरे, उल्हास पवार, अनिल गोळे, संतोष पवार, कृष्णा जाधव, बाळू पवार आदींसह प्रत्येक तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते, समाज बांधव या आंदोलनात सहभागी झाले होते.
आपण ज्यांच्यावर टीका केलीत त्यांच्या पूर्वजांनीच म्हणजे छत्रपती शाहू महाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी मदत केली होती याची आठवण ठेवावी. आपण कुणावर टीका करतो आहोत याचाही विचार करावा. केवळ डॉ. बाबासाहेबांचे नाव वापरू नका, त्यांचे विचारही अमलात आणा, असा सल्ला देत सकल मराठा समाजाचे रायगड जिल्हा समन्वयक विनोद साबळे यांनी अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर या वेळी टीका केली.
अलिबाग शहरातील जोगळेकर नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाले. हिराकोट तलावाजवळ पोलिसांनी त्यांना अडवले. तेथे प्रमुख नेत्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हा समन्वयक विनोद साबळे यांच्या नेतृवाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.
मराठा आरक्षणाला तात्पुरती स्थगिती मिळाली. त्याला आता महिना झाला. त्या विरोधात आंदोलने सुरूच आहेत. आजचे आंदोलन हे एमपीएससी परीक्षा व पोलीस भरती रद्द करावी यासाठी आहे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे शैक्षणिक वर्षात मराठा समाजाच्या मुलांचे नुकसान होणार नाही याची काळजी राज्य सरकारने घ्यावी. 12 टक्के कोटा वाढवून मराठा विद्यार्थ्यांना सामावून घ्यावे. मागील एमपीएससी परीक्षेत उत्तीण विद्यार्थ्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे.
-विनोद साबळे, समन्वयक, सकल मराठा समाज रायगड

RamPrahar – The Panvel Daily Paper