Breaking News

आचारसंहिता लागेपर्यंत नागरी कामांसाठी कटिबद्ध

आमदार गणेश नाईक यांची ग्वाही

नवी मुंबई ः बातमीदार – महापालिकेकडून बेलापूर येथील माताबाल रुग्णालयात कोविड रुग्णालय सुरू करण्यात येणार असल्याचे समजते, परंतु सदर रुग्णालयात कोविड रुग्णालय सुरू केल्यास त्या ठिकाणी उपचार घेणार्‍या नागरिकांना अडचणीचे होईल. सोयीसुविधा नसल्यामुळे त्या ठिकाणी कोविड रुग्णालय सुरू करणे उचित होणार नाही. बेलापूर येथील माताबाल रुग्णालय हे नॉन कोविड रुग्णांवर उपचार करण्याकरिता सुरू ठेवावे, अशी मागणी आमदार गणेश नाईक यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. तसेच पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना आमदार नाईक म्हणाले की, निवडणुकीची आचारसंहिता लागेपर्यंत नागरी कामांसाठी मी कटिबद्ध असून त्यासाठी आयुक्तांची भेट घेतच राहणार. ही माझी शेवटची भेट नाही. सोमवारी (दि. 9) कोविड तसेच इतर नागरी कामांसाठी आमदार नाईक यांनी आयुक्तांची भेट घेतली. त्या वेळी ते बोलत होते.

आरोग्य मंत्रालयाच्या नियमांनुसार औषधोपचार व समुपदेशनासाठी पोस्ट कोविड सेंटर सुरू करावीत.   वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालय सुरू करण्याबाबत आपल्यासोबत वारंवार चर्चा झाली. पूर्ण क्षमतेने वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालय सुरू करण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी. नागरिकांना दूषित पाण्यामुळे कावीळ, गॅस्ट्रो इत्यादी आजार उद्भवतात. त्याकरिता खबरदारीच्या दृष्टीने नवी मुंबई शहरातील सर्व पाण्याच्या टाक्या, जलवाहिन्यांची वेळेवर स्वच्छता राखण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी. पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेंतर्गत अनेक पथविक्रेत्यांना कर्ज मिळण्याकरिता अडचणी येत आहेत. बँकांकडून पथविक्रेत्यांकडे स्वतःची रूम हवी, जामीनदार हवा, तसेच काही बँका 900 रुपये व्हिजीट चार्ज मागत असल्यामुळे अनेक पथविक्रेते या योजनेपासून वंचित राहत आहेत. याबाबत तातडीने निर्णय घेत पालिकेच्या जमाठेवी असलेल्या बँकांनी हे कर्ज द्यावे यासाठी पालिका प्रयत्न करीत असल्याचे आमदार नाईक यांना आश्वासन देताना आयुक्तांनी सांगितले. 

घणसोली नोडमधील रस्ते, फुटपाथ, मलःनिस्सारण वाहिन्या, दिवाबत्ती, नाले यांची तातडीने कामे हाती घेण्याची गरज असून नागरी सुविधांचे आरक्षित असलेले भूखंड सिडकोकडून महापालिकेस तातडीने हस्तांतरित करून घ्यावेत. शहरातील बेघर निराश्रित नागरिकांना पदपथ, रेल्वे स्थानकाबाहेरील मोकळ्या जागेत मुक्काम करावा लागत असून शहरातील बेघर नागरिकांची निवार्‍यावाचून फरफट होत आहे. शहरातील बेघर, निराश्रित नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देत नोडनिहाय रात्र निवारा केंद्रांची उभारणी करावी.  नवी मुंबई शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर सिटी मोबिलिट प्लॅन तयार करण्यात आला आहे. तुर्भे रेल्वे स्थानकासमोर उड्डाणपूल बांधणे, कोपरखैरणे विभागात पावणे पूल ते सेक्टर-11 दरम्यान पूल बांधणे, ऐरोली ते वाशी, वाशी ते उलवे उन्नत सागरी मार्ग करणे, कोपरखैरणे डी-मार्ट येथे पादचारी पूल बांधणे, ठाणे-बेलापूर रस्त्यावरून कोपरखैरणे, घणसोली पामबीचकडे जाण्यासाठी नवीन लिंक महापे लिंकला जोडणे, ऐरोली ते कटई नाका येथे एमएमआरडीए बांधत असलेला उड्डाणपूल ठाणे-बेलापूर रस्त्याला जोडणे अशी महत्त्वाची कामे हाती घेण्याची गरज असल्याचे आमदार नाईक यांनी आयुक्तांना सांगितले. 

आरोग्य विभागातील आशा वर्कर यांना नऊ हजार रुपयांऐवजी 19 हजार रुपये इतके सानुग्रह अनुदान करण्यात यावे. शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागेचे सुशोभीकरण करावे, अशा विविध मागण्यावजा सूचना आमदार नाईक यांनी आयुक्त अभिजित बांगर यांना भेटून केल्या आहेत.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply