Breaking News

मुंबई काँग्रेसचा स्वबळाचा नारा

महापालिका निवडणुकीसाठी नवनियुक्त अध्यक्ष भाई जगताप यांचा आग्रह

पुणे : प्रतिनिधी – राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात असताना तसेच आगामी निवडणुका एकत्रितपणे लढविण्याची चाचपणी सुरू असताना काँग्रेसने मात्र वेगळाच सूर आळवला आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे हातात आल्यानंतर आमदार भाई जगताप यांनी पहिल्याच दिवशी स्वबळाचा नारा दिला आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेसने स्वबळावर लढवावी, असे जगताप रविवारी (दि. 20) पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले.

मुंबई काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष व माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्याबाबत पक्षांतर्गत नाराजीचा सूर होता. त्यामुळेच त्यांच्या जागी आमदार जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडल्यानंतर जगताप यांनी चंपाषष्ठीनिमित्त जेजुरी येथील खंडेरायाचे दर्शन घेतले. पुणे येथील भेटीदरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी ते म्हणाले, एक वेळ होती जेव्हा मुंबई महापालिकेत काँग्रेसचे 75 नगरसेवक होते, मात्र मागील 10 वर्षांमध्ये ही संख्या 30 ते 35वर आली आहे. ती वाढविण्यासाठी पूर्ण ताकदीने लढणार आहोत. आगामी निवडणुकीत काँग्रेसने सर्वच्या सर्व म्हणजे 227 जागा स्वबळावर लढवाव्यात असे कॅप्टन म्हणून माझे मत आहे.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमध्ये डावलले जात असल्याने राज्यातील काँग्रेस नेते नाराज आहेत. याबाबत हायकमांड सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिल्याची घटना ताजी असतानाच मुंबई काँग्रेस अध्यक्ष आमदार भाई जगताप यांनी स्वबळाचा नारा देऊन चर्चेला नवी वाट करून दिली आहे.

गटबाजी थोपविण्याचे नव्या कार्यकारिणीवर आव्हान

गेल्या काही दिवसांपासून मुंबई काँग्रेसमधील गटबाजी हा या पक्षासाठी डोकेदुखीचा विषय ठरला आहे. याआधी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय निरूपम यांच्याऐवजी मिलिंद देवरा यांच्याकडे मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद सोपविण्यात आले होते, मात्र देवरा यांनी फारसे चांगले काम केले नाही. उलट पक्षातील अंतर्गत बंडखोरीही या काळात वाढली होती. त्यानंतर माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा देण्यात आली, पण त्यांनाही प्रभाव पाडता आला नाही. त्यामुळे या जागी आता आमदार भाई जगताप यांची वर्णी लागली आहे. त्यांच्यापुढे सर्वांत आधी पक्षांतर्गत गटबाजी थोपविण्याचे मोठे आव्हान असणार आहे. याशिवाय कार्यकारी अध्यक्ष म्हणून चरणसिंग सप्रा, माजी मंत्री नसीम खान यांना प्रचार समिती अध्यक्ष आणि सुरेश शेट्टी यांना जाहीरनामा समितीचे अध्यक्ष करण्यात आले आहे. या सर्वांची कसोटी लागणार आहे.

Check Also

उलवे नोडमध्ये रविवारी महासंस्कृती : जागर स्त्री शक्तीचा सांस्कृतिक कार्यक्रम

भजनी मंडळांना भांडवली अनुदानाचे होणार वाटप पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि …

Leave a Reply