पनवेल : वार्ताहर
पनवेल एसटी बस स्थानकावर बस पकडण्याच्या नादात घाई गर्दीत असलेल्या प्रवाशांच्या खिशातील पाकीटमारीसह इतर वस्तू चोरणारी टोळीला पनवेल शहर पोलिसांनी गजाआड केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून पनवेल बस स्थानकात पाकीटमारी, महिलांच्या पर्समधील दागिने व इतर वस्तू काढणे, मोबाइल काढणे आदी प्रकार सुरू होते. यासंदर्भात अनेक तक्रारी पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आल्या होत्या. यासंदर्भात वरिष्ठ निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे, हेड कॉन्स्टेबल नितीन वाघमारे, पोलिस नाईक पंकज पवार, गणेश चौधरी, राजू खेडकर, विनोद पाटील आदींच्या पथकाने एसटी स्टँड परिसरात सापळा रचून रामेश्वर गायकवाड (वय 40, रा. चिंचोली), अंकुश जाधव (वय 49, रा. वाघलखेडा), शरद जाधव (वय 38, रा.वाघलखेडा), बाबासाहेब गायकवाड (वय 65, रा. ऐळी) या चौघांना ताब्यात घेतले आहे. चोरट्यांकडे अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडे बस स्थानकातील पाकीटमारी व इतर गुन्ह्यांसदर्भात माहिती मिळाली आहे. तर त्यांचा एक साथीदार पसार झाला असून त्याचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत.
RamPrahar – The Panvel Daily Paper