एकाचा जागीच मृत्यू; एक जण जखमी
मोहोपाडा : प्रतिनिधी
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील रिसवाडी गावाच्या हद्दीत मंगळवारी (दि. 23) सकाळी 6.30च्या सुमारास मालाने भरलेल्या आयसर टेम्पोला मागून कंटेनरने जोरदार धडक दिली. झालेल्या अपघातात टेम्पोचालकाचा जागीच मृत्यू झाला, तर धडक देणार्या कंटेनर चालकावर एमजीएम हॉस्पिटलात उपचार सुरू आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून मुंबईहून पुण्याच्या दिशेला माल घेवून निघालेला आयसर टेम्पो (क्र. एमएच 04 एचडी 1124) हा द्रुतगती महामार्गावरील रिसवाडी गावाच्या हद्दीत आला असताना मागील चाकात काही बिघाड असावा यासाठी टेम्पोचालक आरीफ शेख (वय 23) याने आपल्याकडील टेम्पो थांबविला. याचवेळी पाठीमागून आलेला कंटेनर (क्र. एमएच 03 सिडी 9992) चालक संतोषकुमार गुप्ता याचा वाहनावरील ताबा सूटल्याने पुण्याच्या दिशेने निघालेला कंटेनर जोरात पुढील आयसर टेम्पो वर आदळला. या वेळी टेम्पोचालक मागील चाकाचे काम करत असताना कंटेनरच्या चाकाखाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात आरीफ शेख (रा. कानपूर, युपी) याचा जागीच मृत्यू झाल्याने त्याच्यावर चौक रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले, तर जखमी कंटेनर चालक संतोषकुमार गुप्ता याला एमजीएम हॉस्पिटलात दाखल करण्यात आले. अपघात होताच आयआरबी कर्मचारी, देवदूत, रसायनी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याबाबत रसायनी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper