कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतातील आयोजनावर प्रश्नचिन्ह
दुबई ः वृत्तसंस्था
भारतात यंदाच्या वर्षाच्या शेवटाला आंतरराष्ट्रीय टी-20 वर्ल्डकप स्पर्धेचे आयोजन होणार आहे, पण देशात सातत्याने वाढत्या कोरोना रुग्णांच्या परिस्थितीमुळे स्पर्धेच्या भारतातील आयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसत आहे. त्यात आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) वतीने करण्यात आलेले विधान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) चिंता वाढवणारे आहे.
आयसीसीचे अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जोफ अलार्डिस यांनी यंदाच्या वर्षात भारतात होणार्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी ’बॅकअप प्लान’ तयार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आयसीसीकडून टी-20 वर्ल्डकप इतरत्र हलविण्याचा विचार सुरू असल्याची चर्चा होत आहे. दरम्यान, देशात कोरोना वाढत असला तरी टी-20 वर्ल्डकप भारतातून हलवून दुसर्या ठिकाणी नेण्याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही.
टी-20 वर्ल्डकपचे आयोजन ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यामध्ये केले जाणार आहे, पण गेल्या काही दिवसांपासून देशात दररोज एक लाखाहून अधिक कोरोना रुग्ण आढळत आहेत, पण असे असतानाही देशात आयपीएल स्पर्धा प्रेक्षकांविना खेळविण्याची तयारी बीसीसीआयने केली आहे. शुक्रवारपासून या स्पर्धेला सुरुवातदेखील होत आहे. त्याच धर्तीवर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्येही वर्ल्डकप स्पर्धेचेही आयोजन केले जाईल, असा विश्वास बीसीसीआयला आहे.
टी-20 वर्ल्डकप स्पर्धेच्या निर्धारित योजनेनुसारच आम्ही सध्या पुढे जात आहोत, पण आमच्याकडे बॅकअप प्लानदेखील तयार आहे. त्या गोष्टींवर सध्या आम्ही विचार करत नाहीय. बीसीसीआयसोबत आमची चर्चा सुरू आहे. गरज पडल्यास बॅकअप योजनेवर काम केले जाईल, असे आयसीसीचे अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जोफ अलार्डिस यांनी सांगितले. कोविड काळात क्रिकेट कसे खेळवले जातेय हे समजून घेण्यासाठी आयसीसी इतर देशांच्या क्रिकेट बोर्डाशीदेखील संपर्कात असल्याचे ते म्हणाले.
सध्या अनेक देशांमध्ये क्रिकेट खेळवले जात आहे. आम्ही याकडे सकारात्मक पद्धतीने पाहत आहोत. दोन महिन्यांत कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम फेरीचाही सामना खेळवला जाणार आहे, असे अलार्डिस म्हणाले.
…तर यूएईमध्ये स्पर्धा
गेल्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संयुक्त अरब अमिरातमध्ये (यूएई) आयपीएल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्याच पार्श्वभूमीवर भारतात टी-20 वर्ल्डकप स्पर्धेचे आयोजन होऊ शकले नाही, तर यूएईमध्ये या स्पर्धेचे आयोजन केले जाऊ शकते, असा आयसीसीचा बॅकअप प्लान असल्याचे बोलले जात आहे.