मुरूड : प्रतिनिधी
शनिवार व रविवार वीकएण्डची समाप्ती झाल्यानंतर सोमवारी मुरूडच्या बाजारपेठेत मोठी गर्दी पहावयास मिळाली. दोन दिवस घरीच बसून नागरिकांनी वीकएण्डला उत्तम साथ दिली होती. मात्र सोमवारी किराणा माल व भाजी खरेदीसाठी मुरूड बाजारपेठेत मोठी गर्दी दिसून आली. बुधवारी मुस्लिम समाजाचे रोजे सुरु होत असल्याने त्यांची खरेदीसाठी गर्दी झाली होती. दोन दिवस बँकासुद्धा बंद होत्या, त्यामुळे लोकांचे आर्थिक व्यवाहार थांबले होते. आज सकाळी बँका उघडल्यानंतर लोकांनी गर्दी केली होती. गेल्या दोन दिवसात कोणतीही खरेदी करता आली नव्हती, त्यामुळे लोकांनी प्रथम खरेदी करण्यावर जोर दिला. पुन्हा एकदा बाजारपेठ फुलून गेली. ही गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मुरूड नगर परिषदेकडून मास्क न घालणार्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथकसुद्धा नियुक्त करण्यात आले होते.
नागोठणे : प्रतिनिधी

वीकएण्डचा लॉकडाऊन सोमवारी सकाळी संपल्यानंतर नागोठण्यातील बाजारपेठेत ग्राहकांनी खरेदीसाठी प्रचंड प्रमाणात गर्दी केल्याने कोरोनाच्या नियमांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे स्पष्ट झाले. शनिवार, रविवारी दोन दिवस शहरात कडक लॉकडाऊन पाळण्यात आला होता. इतर पाच दिवस फक्त अत्यावश्यक सेवेतील दुकाने उघडी ठेवण्यात शासनाकडून परवानगी देण्यात आली असली तरी, काही लहान मोठ्या दुकानदारांनी आपली दुकाने उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र सकाळी पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांनी स्वतः फिरून दुकाने बंद करण्याची सूचना केल्यावर अत्यावश्यक सेवेतील वगळता इतर दुकाने बंद करण्यात आली. किराणा दुकाने चालू असल्याने इतर दुकाने उघडी ठेवण्याच्या मागणीसाठी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश जैन, अनिल काळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षक घुटुकडे यांची सकाळी पोलीस ठाण्यात भेट घेतली. मात्र ही चर्चा असफल ठरली असल्याचे समजते. मंगळवारी गुढीपाडवा असल्याने आज बाजारात खरेदीसाठी गर्दी झाली
होती, असे काही ग्राहकांकडून सांगण्यात आले. दरम्यान, सोमवारी सकाळी रिक्षा वाहतूक सुरू होती. मात्र, एसटी वाहतूक काही अंशीच चालू झाली होती. याबाबत वाहतूक नियंत्रक चंद्रकांत भोईर यांना विचारले असता, सकाळी मुंबई, ठाणे, पनवेल बाजूकडे जाणार्या बसेस गेल्या असून, दुपारनंतर त्या पुन्हा परतीच्या मार्गाला फिरल्यावर सायंकाळपर्यंत एसटी बससेवा पुन्हा सुरळीत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
खोपोली : प्रतिनिधी

वीकेण्ड लॉकडाऊननंतर सोमवारी नागरिकांनी खोपोली बाजारपेठेत खरेदीसाठी एकच गर्दी केली, पण दुकानेच बंद असल्याने, खरेदीसाठी आलेल्या नागरिकांचा भ्रमनिरास झाला. वीकेण्ड लॉकडाऊननंतर बाजारपेठ उघडी राहतील असा व्यापार्यांचा व नागरिकांचा अंदाज होता, मात्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लॉकडाऊनचा निर्णय झाल्याचे वृत्त धडकताच स्थानिक प्रशासनाने बाजारपेठेत दुकाने बंद करण्याचा निरोप दिल्यानंतर लागलीच दुकाने बंद करण्याचा आली. नागरिक खरेदीसाठी खोपोलीत रिक्षा व अन्य वाहनाने आल्याने बाजारपेठेत वर्दळ वाढली, रेल्वेची सेवा सुरळीत असल्याने, मुंबईकडून येणार्या प्रवाशांची व परिसरातील संख्या हजाराच्या घरात होती मात्र दुकाने बंद असल्याने नागरिकांना परत जावे लागले. वीकेण्ड लॉकडाऊननंतर फळे व भाजी विक्रेत्यांच्या गाड्यांनी खोपोली बाजारात गर्दी केली, अनेक व्यापारी शटर बंद करून दुकानाच्या बाहेर थांबले होते. ते नवा आदेश काय येतो, याच्या प्रतीक्षेत होते, त्यामुळे सर्वत्र संभ्रमाचे वातावरण पाहावयास मिळाले.दरम्यान, शासनाच्या पुन्हा लॉकडाऊन निर्णयामुळे व्यापारी वर्गात नाराजीचे सूर उमटले. ऑनलाइन वस्तू घरपोच मिळत आहेत पण आम्हाला मात्र दुकाने बंद करावे लागत आहेत, त्यामुळे आमच्यावर अन्याय होत असल्याच्या प्रतिक्रिया खोपोलीतील अनेक दुकानदारांनी दिल्या.
माणगाव : प्रतिनिधी
कोविडच्या पार्श्वभूमीवर शनिवार व रविवारी करण्यात आलेल्या दोन दिवसांच्या वीकेण्ड लॉकडाऊननंतर माणगाव बाजारपेठेत सोमवारी (दि. 12) सकाळपासून नागरिकांची खरेदीसाठी गर्दी केली होती. वीकेण्ड लॉकडाऊनमुळे माणगाव बाजारपेठेत शनिवार व रविवारी शुकशुकाट होता. नेहमी गजबजलेली माणगावची बाजारपेठ सुनी सुनी वाटत होती. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य सरकार कधीही दोन ते तीन आठवड्यांचा लॉकडाऊन जाहीर करेल, या भीतीने नागरिक दैनंदिन गरजेच्या वस्तू, सामान खरेदी करून ठेवीत आहेत. त्यातच मंगळवारी (दि. 13) गुढीपाडवा आणि बुधवारी (दि.14) मुस्लिम धर्मियांचा पहिला रोजा आहे. त्यामुळे तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी रमजानच्या खरेदीसाठी माणगावच्या बाजारपेठेत गर्दी केली होती.
RamPrahar – The Panvel Daily Paper