Breaking News

कोरोना लस, ऑक्सिजन, उपकरणांवरील सीमा शुल्क माफ

मोदींचा दिलासादायक निर्णय

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
केंद्र सरकारने कोरोनावरील लशी आणि ऑक्सिजनवरील आयातीवर लागणारे सीमा शुल्क तसेच आरोग्य सेस तीन महिन्यांसाठी माफ केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीनंतर लगेचच हा निर्णय जाहीर करण्यात आला. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत देश मोठ्या संकटाचा सामना करीत आहे. त्यामुळे या निर्णयाने मोठा दिलासा मिळणार आहे.
कोरोना किंवा इतर आजारासाठी लागणार्‍या उपकरणांच्या आयातीवरील शुल्कही यामध्ये माफ केले जाणार आहे. त्यात ऑक्सिजनबरोबरच त्यासाठीचे जनरेटर, स्टोरेज टँक, फिलिंग सिस्टीम आणि कॉन्सन्ट्रेटर यांच्या आयातीवरही ही सूट लागू असणार आहे. या उपकरणांच्या आयातीवर शुल्क माफ केल्याने या सर्वांची उपलब्धता वाढेल आणि ते अधिक स्वस्तात मिळू शकतील, असे मत केंद्र सरकारने व्यक्त केले आहे.
भारतात सध्या कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन लशींद्वारे लसीकरण केले जात आहे. या दोन्ही लशी देशांतर्गत तयार होतात. त्याशिवाय भारताने रशियाच्या स्पुटनिक व्ही या लशीच्याही आपत्कालीन वापराला मंजुली दिली आहे. त्यामुळे या लसीचे जवळपास 20 कोटी डोस हैदराबादमध्ये तयार केले जाणार आहेत. केंद्र सरकारवर कोरोनाच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या तीन दिवसांत घेतलेली कोरोनासंबंधीची ही तिसरी तातडीची बैठक आहे.
देशात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्राने सीमा शुल्क माफ केल्याने ऑक्सिजन व लशींची उपलब्धता वाढून दिलासा मिळणार आहे.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून मराठी अर्थशास्त्र परिषदेला 20 लाखांची देणगी

पनवेल : रामप्रहर वृत्त समाजाच्या हितासाठी अखंडपणे सामाजिक कार्य करणारे आणि कायम सामाजिक बांधिलकी जपणारे …

Leave a Reply