नैसर्गिक आपत्तीग्रस्त महाड तालुका

महाड हा ऐतिहासिक आणि सामाजिक क्रांतीचा तालुका म्हणून ओळखला जातो, मात्र आता आपत्तींचा तालुका म्हणून महाडची ओळख होऊ लागली आहे, हे महाडसाठी भूषणावह नाही. नैसर्गिक संकटांमुळे भविष्यात महाड तालुक्याचा विकासच खुंटण्याची भीती आहे. तरुण आणि व्यापारी मोठ्या प्रमाणात विस्थापित होण्याची शक्यता आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे तालुक्यातील दळणवळणाची साधने नष्ट होत आहेत. नागरी सुविधांवरही त्याचा परिणाम होत आहे. महापुरात महाड औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांचेदेखील हजारो कोटींचे नुकसान झाले. अतिउच्च वीजवाहिन्यांचे टॉवर पुरामुळे कोसळल्याने औद्योगिक वसाहतीसह महाड तालुक्याचा वीजपुरवठा 10 दिवस खंडित झाला होता. या औद्योगिक वसाहतीमधील सर्व कारखाने या काळात बंद होते. याचा परिणाम महाडच्या प्रगतीवर आणि नावलौकिकावर होणार आहे. राजकीय इच्छाशक्ती नसल्याने आधीच या तालुक्याचे मोठे नुकसान झाले आहे, त्यात आता या नैसर्गिक संकटांमुळे तालुक्याचे कंबरडेच मोडून जाणार आहे. 2005पासून सुरू झालेली ही नैसर्गिक आपत्ती थांबण्याचे नावच घेत नाही. 2005 च्या महापुरात आणि जवळपास नऊ गावांवर दरड कोसळून शेकडो लोक मृत्युमुखी पडले होते. तर हजारो बेघर झाले होते. मालमत्तेचे करोडोंचे नुकसान झाले होते. त्यानंतर पूरपरिस्थिती दरवर्षी गंभीर होत गेली आहे. महाबळेश्वर, कशेडी, वाळण, किल्ले रायगड विभागात पडणार्‍या मुसळधार पावसाचे पाणी काळ, गांधारी आणि सावित्री या नद्या थेट महाड शहरात घेऊन येतात. त्यामुळे महाडचा पुराचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे, तसेच बेसुमार वृक्षतोड आणि उत्खननामुळे सह्याद्रीचे डोंगर अस्थिर झाले आहेत. दिवसागणिक दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. आंबिवली कोकण रेल्वे दुर्घटना, सावित्री पूल दुर्घटना, आंबेनळी बस दुर्घटना, तारीक गार्डन इमारत दुर्घटना, ढगफुटी, 22 जुलै रोजी आलेला महापूर आणि तळीये दरड दुर्घटना या घटना महाडच्या नैसर्गिक आपत्तीत वाढ करीत आहेत. हे असे का होत आहे? पुराचे एवढे पाणी आले कुठून? या पुढे ही संकटे अशीच येत राहणार का? यावर उपाय काय, असे अनेक प्रश्न महाडकरांना पडले आहेत. दरड कोसळण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन महाड महसूल प्रशासनाने तालुक्यातील 48 गावांमधील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर होण्याच्या सूचना पावसाळ्यापूर्वी दिल्या होत्या. भूवैज्ञानिक विभागाकडून दरडींचा धोका असलेल्या गावांची यादी सादर केली जाते, मात्र या वेळी तळीये गावात दरड आल्याने नव्याने केलेल्या तपासणीत 19 नव्या गावांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे महाड तालुक्यातील दरड संभाव्य गावांची संख्या आता 49 वरून 68 झाली आहे. महाड तालुक्यात पारमाची या गावात 20 वर्षापूर्वी दरड कोसळली होती. त्यानंतर दरडी कोसळण्याचे सत्र सुरूच राहिले आहे. 2005 मध्ये तर दरडी कोसळून मोठ्या प्रमाणावर वित्त आणि जीवितहानी झाली होती. दासगाव, जुई आणि कोंडीवते या गावात दरडी कोसळल्या होत्या, तसेच तालुक्यात डोंगर भागात दरडी आल्या आहेत. सह्याद्रीवाडी, हिरकणीवाडी या गावांत तर जमिनीला भेगा पडण्याच्या घटनादेखील घडल्या आहेत. याबाबत भूवैज्ञानिक शाखेकडून तालुक्यातील गावांची पाहणी करण्यात आली होती. यामध्ये महाडमधील 49 गावांना दरडीचा धोका असल्याचे निरीक्षण करण्यात आले. त्यानुसार गेल्या काही वर्षांपासून महसूल विभागाकडून या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे, तसेच तेथील ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत व्हावे, असे सांगण्यात येत आहे. तशा नोटिसाही या ग्रामस्थांना महसूल विभागाकडून देण्यात आल्या आहेत. महाड तालुक्यातील तुडील, टोळ खुर्द, मोरेवाडी (शिंगरकोंड), आंबिवली पातेरेवाडी, कोंडीवते, मुठवली, चांढवे खुर्द, सव, रोहन, पुनाडे, कोथेरी जंगमवाडी, पाचाडवाडी, मुमुर्शी बौद्धवाडी, चोचिंदे, गोठे बुद्रुक, पारमाची, आदिस्ते, खैरे, वाळण, रेवतळे, मानेची धार, मोहोत, वराठी, कुर्ले दंडवाडी, आंबेनळी, वामने, टोळ बुद्रुक, नवीन कोंडीवते, पिंपळकोंड, वलंग, शेलटोली, मुमुर्शी गावठाण, कुंबळे, चोचिंदे कोंड, वीर, मुमुर्शी आंब्याचा कोंड, तळोशी, बिरवाडी वेरखोले, करंजखोल, सांदोशी हेटकरकोंड, वीर मराठवाडी अशा 49 गावांतील सुमारे 17,733 ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत होण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र 22 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीत तळीये गावातील कोंडाळकरवाडीमध्ये दरड कोसळून आतापर्यंत 84 जणांना प्राण गमवावा लागला आहे. त्यातच किल्ले रायगड परिसरातील हिरकणीवाडी, परडी, खर्डी आदी वाड्यांच्या परिसरात जमिनीला तडे जाणे, जमीन खचणे अशा घटना घडल्या आहेत. यामुळे संपूर्ण प्रशासन हादरले असून, नव्याने काही गावांचा सर्व्हेही करण्यात आला. त्यामध्ये 19 गावे आणि वाड्यांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. यामुळे महाड तालुक्यातील दरड संभाव्य गावांची संख्या आता 49 वरून 68 झाली आहे. यामध्ये हिरकणीवाडी, मोहोत (सुतारवाडी), मोहोत (भिसेवाडी), वाघेरी (आदिवासीवाडी), भिवघर (कळंबेवाडी), गोंडाळे (कडवेवाडी), वरंध (पोकळेवाडी), वरंध (बौद्धवाडी), आंबेनळी सह्याद्रीवाडी, कोथेरी (तांदळेकरवाडी), माझेरी, खर्डी, केतकीचा कोंड, तळीये, रायगडवाडी (परडी), पिंपळवाडी, रुपवली, निगडे, बारसगाव या गावांचा आणि वाड्यांचा संभाव्य दरडग्रस्त गावांच्या यादीत समवेश करण्यात आल्याची माहिती महसूल विभागाकडून प्राप्त झाली आहे.

-महेश शिंदे

Check Also

Vor die eine Auszahlung denkbar sei, in kraft sein halb wahrscheinlich Umsatzbedingungen

Bares unter anderem Bonusgewinne In welchem ausma? diese Gewinne schenke & amyotrophic lateral sclerosis Bonusgeld …

Leave a Reply