Breaking News

पोसरी-साळोख रस्त्याची दुरवस्था; गणेेत्सोवापूर्वी दुरुस्ती करण्याची मागणी

कर्जत : बातमीदार

स्थानिक आमदारांच्या पोसरी गावासमोरून साळोख गावाकडे जाणारा सहा किलोमीटर लांबीचा रस्ता खड्डेमय झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दुरुस्त केला नसल्यामुळे या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. दरम्यान, गणेशोत्सवापूर्वी या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिक रहिवासी करीत आहेत. कर्जत तालुक्यातील पोसरी-साळोख या सहा किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर सात गावे असून यापूर्वी या रस्त्याचे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मजबुतीकरण आणि डांबरीकरण करण्यात आले होते. त्यानंतर अनेक वर्षे या रस्त्याची डागडुजी जिल्हा परिषद बांधकाम विभागाने केलेली नाही.  या भागातील शेतीत बाराही महिने पाणी असते. त्यामुळे मातीचा भराव टाकून तयार केलेला हा रस्ता  अवजड वाहने जाऊन काही ठिकाणी दबला आहे, तर या रस्त्यावर पावलोपावली खड्डे पडले आहेत. या रस्त्याने नव्याने दुचाकी घेऊन येणार्‍या वाहन चालकांना त्याची कल्पना नसल्याने अपघात होत असतात. पोसरी-साळोख या रस्त्याच्या आजूबाजूला तिवरे, आरवंद, इंजिवली, वरई, दहिगाव, साळोख ही मोठ्या लोकवस्तीची गावे आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून वाहनांची सतत रहदारी असते. ते लक्षात घेता या रस्त्याची रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी वरई ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शंकर भुसारी यांनी केली आहे.

लवकरच गणरायाचे आगमन होणार असल्याने, पोसरी-साळोख रस्त्याची गणेशोत्सवापूर्वी डागडुजी करणे आवश्यक आहे. ती रायगड जिल्हा परिषदेने लवकरात लवकर करावी.

-दीपक धुळे, माजी उपसरपंच, वरई, ता. कर्जत

पावसाळ्यात नुकसान झालेल्या कर्जत तालुक्यातील सर्व रस्त्यांची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पाहणी करण्यात आली आहे. त्याच वेळी आम्ही जिल्हा परिषदेकडे या रस्त्यांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव सादर केले आहेत.

-प्रल्हाद गोपणे, प्रभारी उपअभियंता, सार्वजनिक

बांधकाम विभाग कर्जत

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 अभंगांचे व्हिडीओ चित्रिकरण

नादब्रह्म साधना मंडळाचा उपक्रम पनवेल ः रामप्रहर वृत्तथोर दानशूर व्यक्तिमत्व, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर …

Leave a Reply