कर्जत : प्रतिनिधी
चाकूचा धाक दाखवून रोख रक्कम, पॅनकार्ड, एटीएम कार्ड असा ऐवज बळजबरीने चोरणार्या चोराला कर्जत पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अधिक तपासात त्याच्यावर कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात सहा गुन्हे नोंद असल्याची माहिती उघडकीस आली आहे.
कर्जत भिसेगाव येथील संतोष अरुण भोसले (वय 40) हे पहाटे नोकरीनिमित्त मुंबईकडे जात असताना कर्जत रेल्वे स्टेशनच्या तिकीट घराजवळ अज्ञात इसमाने चाकुचा धाक दाखवून त्यांच्या जवळील रोख रक्कम, पॅनकार्ड, एटीएमकार्ड असा ऐवज बळजबरीने चोरुन नेला होता. त्याबाबत संतोष भोसले यांनी कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
कर्जत पोलीस ठाण्याच्या निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक राजू आल्हाट, उपनिरीक्षक महेश धोंडे, अंमलदार सुभाष पाटील, भूषण चौधरी, गणेश पाटील, अश्रूबा बेंद्रे, हवालदार स्वप्नील येरूणकर यांच्या पथकाने गुन्ह्याचा तपास सुरू केला.
चोरट्याच्या वर्णनावरून पोलीस अंमलदार भूषण चौधरी यांनी खबर्याकडून अज्ञात चोरट्याची माहिती घेतली. आणि सदर गुन्ह्यातील संशयीत इसम रोहीत लालता गौतम उर्फ याकूब (वय 23, रा. क्रांतीनगर,भिसेगाव, कर्जत) याला गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकाने एक तासांच्या आत ताब्यात घेतले. अधिक तपासात त्याच्यावर कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल असल्याचे आढळून आले.
RamPrahar – The Panvel Daily Paper