Breaking News

कलावंत हा जन्माला यायला लागतो; दिलखुलास गप्पांमध्ये शरद पोंक्षे यांनी साधला मनमोकळा संवाद

पनवेल ः रामप्रहर वृत्त
मला अभिनयापलीकडे दुसरे काही येत नाही. लहानपणापासूनच नटाखेरिज दुसरे काही व्हायचेही नव्हते. जन्माला आल्यापासून आतापर्यंत जी माणसे भेटत गेली त्यांच्यातून विविध व्यक्तिरेखांचे बेअरिंग सापडले. याचे सारे श्रेय मी परमेश्वराला देतो. मुळात कलावंत हा जन्माला यायला लागतो, अशा शब्दांत सुप्रसिद्ध अभिनेेते आणि लेखक शरद पोंक्षे यांनी आपला जीवनप्रवास उलगडला. ते पनवेल येथे दिलखुलास गप्पा या कार्यक्रमात शनिवारी (दि. 23) बोलत होते. भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक सेलच्या वतीने संवादमाला पुष्प-3 अंतर्गत शरद पोंक्षे यांच्याशी दिलखुलास गप्पा हा कार्यक्रम पनवेल शहरातील ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहात झाला. एबीपी माझा वृत्तवाहिनीचे निवेदक दीपक पळसुळे यांनी त्यांची मुलाखत घेतली. या वेळी पोंक्षे यांनी नाट्यक्षेत्रातील प्रवास, सार्वजनिक जीवनातील किस्से, मी नथुराम गोडसे बोलतोय नाटकातील प्रसंग आदी विविध विषयांवर मनमोकळेपणाने संवाद साधला. या कार्यक्रमाला भाजप सांस्कृतिक सेलचे प्रदेशाध्यक्ष शैलेश गोजमगुंडे, सहसंयोजक उमेश घळसाशी, पश्चिम महाराष्ट्र संयोजक नरेंद्र अमले, प्रदेश सदस्य सुनील सिन्हा, इतिहास अभ्यासक तथा ‘मी आणि नथुराम’ पुस्तकाचे प्रकाशक पार्थ बावस्कर, पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, भाजप शहराध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक नितीन पाटील, नगरसेविका चारुशीला घरत, दर्शना भोईर, अ‍ॅड. वृषाली वाघमारे, रूचिता लोंढे, शहर सरचिटणीस अमरिश मोकल, नाट्य परिषद पनवेल शाखा सचिव श्यामनाथ पुंडे, सांस्कृतिक सेल कोकण प्रदेश संयोजक राहुल वैद्य, सहसंयोजक दीपक पवार, अक्षय्या चितळे, जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, शहर संयोजक गणेश जगताप, संजीव कुलकर्णी, सदस्य अमोल खेर, अथर्व गोखले, चिन्मय समेळ आदी उपस्थित होते. मुलाखतीत पुढे बोलताना शरद पोंक्षे यांनी सांगितले की, मी कुठल्याही भूमिकेचा फार अभ्यास करीत नाही. मी फक्त त्या व्यक्तीला फॉलो करतो. जास्तीत जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करतो आणि लोकांना ते आवडते. या वेळी पोंक्षे यांनी एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, डोंबिवलीत एका कार्यक्रमासाठी मला बोलावले होते. एका विद्वान प्रवचनकाराचा माझ्या हस्ते सत्कार करण्यात येणार होता. मी म्हटले हा माणूस एवढा मोठा आणि माझ्या हस्ते सत्कार हे चुकतेय. सत्कारासाठी मोठा माणूस शोधा. मग आयोजकांनी मला सांगितले की त्या प्रवचनकारांचीच इच्छा आहे त्यांचा सत्कार माझ्या हस्ते व्हावा. या प्रवचनात त्यांनी मनुष्याच्या जन्माबाबत माहिती दिली. त्यांच्या मते 80 टक्के लोक सर्वसामान्य म्हणून जन्माला येतात आणि उरलेले 20 टक्के असामान्य असतात, ज्यांना परमेश्वर विशिष्ट उद्देशाने जन्माला घालतो. या 20 टक्क्यांमध्ये प्रत्येकी पाच याप्रमाणे चार भाग सामावलेले आहेत. यात साहित्यिक, राजकारणी, कलावंत आणि चोर-दरोडेखोर यांचा समावेश असतो. ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकाला झालेल्या विरोधाविषयी पोंक्षे यांना विचारल्यावर त्यांनी सांगितले की, या नाटकाला झालेल्या राजकीय विरोधाचा अंत नाही. गेली 20 वर्षे कधीही शेवटच्या प्रयोगापर्यंत हा प्रश्न सुटला नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसवाले सतत विरोध करीत राहिले. ठाण्यात एका प्रयोगाच्या वेळी राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी मोर्चा काढला, मात्र त्यांच्याच पक्षाचे ज्येष्ठ नेते वसंत डावखरे आत माझ्यासोबत चहा पित होते. मी म्हणालो, तुम्ही इथे ते बाहेर मोर्चा काढताहेत. त्यावर डावखरे म्हणाले, मूर्ख आहेत ते. नाटक नाटकासारखे बघायचे असते. यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. असाच एक पुण्यातील प्रसंग पोंक्षे यांनी सांगितला. नथुराम नाटकाचा यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात प्रयोग होता. त्या वेळी मला मारायचे बाकी ठेवले होते. त्यानंतर पुण्यातील निवडणुका संपल्या आणि त्याच ठिकाणी प्रयोग झाला. तेव्हा मात्र कुत्रंसुद्धा आले नव्हते त्या पक्षाचे. सातार्‍यातही आधी विरोध झाला. मग प्रयोग व्यवस्थित झाला. नंतर लय भारी काम केले म्हणून त्याच लोकांनी कौतुक केले. नेत्यांना वैचारिक बैठक नाही. इतिहासाबद्दल माहीत नाही. अशा वेळी कार्यकर्त्यांकडून काय अपेक्षा करणार, असे पोंक्षे यांनी नमूद केले. या वेळी ‘मी आणि नथुराम’ या पुस्तकाच्या आठव्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. कोरोना नियमांचे पालन करून झालेल्या या कार्यक्रमास श्रोत्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply