Breaking News

एसटी कर्मचार्‍यांच्या मागणीला भारतीय मजदूर संघांचा पाठिंबा

उरण : वार्ताहर

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करा, या मागणीला भारतीय मजदूर संघ रायगड जिल्हा या संघटनेने पाठिंबा दिला असून संघटनेतर्फे त्याबाबतचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कर्मचार्‍यांनी 27 ऑक्टोबरपासून आपल्या विविध मागण्यांबाबत आंदोलन सुरु केलेले आहे. या आंदोलनात वेतन आयोग, महागाई भत्ता याबरोबरच मुख्य मागणी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे विलिनीकरण करा ही आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ हा राज्य सरकारचा अत्यंत महत्वाचा उपक्रम आहे. गेल्या काही वर्षांपासून हा उपक्रम दिवसेंदिवस अधिकाधिक तोट्यात जात आहे. कोरोनाच्या काळात या परिवहन सेवेने खूप चांगली सेवा दिली, मात्र अत्यल्प वेतनामुळे कर्जबाजारी होऊन अनेक कर्मचार्‍यांनी आत्महत्या केली. अनेक वर्ष महामंडळाची सेवा करुन निवृत्त झालेल्या कामगारांना त्यांची कायदेशीर देणी अद्यापपर्यंत मिळालेली नाहीत. या सर्व प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधावे आणि हे प्रश्न सोडवून घेण्यासाठी कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. कामगारांची एकच मागणी आहे की, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ हे राज्य सरकारमध्ये विलीन करण्यात यावे आणि या कर्मचार्‍यांना राज्य कर्मचार्‍यांप्रमाणे वेतन व भत्ते मिळावे. या महामंडळातील कर्मचार्‍यांना न्याय द्यावा अशी आग्रहाची विनंती आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

एसटी संपकर्‍यांची भेट घेऊन संघटनेतर्फे हे निवेदन मुख्यमंत्र्याकडे पाठविण्यात आले. या वेळी संघटनेचे अध्यक्ष सुरेश पाटील, उरण तालुकाध्यक्ष लंकेश म्हात्रे, कामगार नेते सुधीर घरत, रंजनकुमार आदी उपस्थित होते.

Check Also

नांदगाव येथे भाजप महायुतीचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात …

Leave a Reply