कोरोना महामारी काही थांबायचे नाव घेत नाहीये. हा संसर्ग वारंवार डोके वर काढत आहे. कोरोनाप्रमाणेच महाराष्ट्रातील महाविकास आघाडीत सातत्याने कुरबुरी होत आहेत. त्यावर आघाडीतील नेते तात्पुरती मलमपट्टी करीत असले, तरी तीन पक्षांतील कार्यकर्ते मात्र ऐकायला तयार नाहीत, हे ठाण्यातील घटनेवरून पुन्हा एकदा समोर आले आहे.
भिन्न विचारधारा आणि परस्परविरोधी ध्येय-धोरणे असलेले दोनपेक्षा जास्त पक्ष एकत्र आल्यावर काय होते हे राज्यातील महाविकास आघाडीतील सततच्या भांडणांमुळे सहज लक्षात येते. कधी शिवसेना आणि काँग्रेसमध्ये वादावादी, कधी राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना सामना, तर कधी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये तू तू मैं मैं असे प्रकार या ना त्या कारणाने घडत आहेत. अशाच प्रकारे शनिवारी ठाण्यातील खारेगाव येथील उड्डाणपुलाच्या लोकार्पण कार्यक्रमात शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील वाद उफाळून आला. वाहतूक कोंडी सुटण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे व गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेले हे काम मार्गी लागून नागरिकांना सुविधा उपलब्ध झाल्याने आनंद व्यक्त करण्याऐवजी आघाडीतील दोन पक्षांनी श्रेयवादावरून गोंधळ घातला. राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परस्परांच्या समोर उभे राहून घोषणाबाजी केली. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांचे नेते व गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांचे नाव घेऊन आगे बढोच्या घोषणा देत होते, तर दुसरीकडे शिवसैनिक हे कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला असे म्हणत शिवसेना नेते व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचा जयजयकार करीत होते. दोन्हीकडील कार्यकर्त्यांना आवरताना पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत होती, तर जनता हा कलगीतुरा पाहून डोक्यावर हात मारत होती. या पुलाच्या लोकार्पणासाठी शिंदे व आव्हाड येणार असल्याने दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आधीच बॅनरबाजी करून ते झेंडे घेऊन घोषणा देत होते. शिवसेनेच्या बॅनरवर सततच्या पाठपुराव्याला यश असे लिहिले होते, तर राष्ट्रवादीच्या बॅनरवर वचनपूर्ती असा उल्लेख होता. अखेर दोन्ही नेत्यांनी कार्यकर्त्यांना शांत केले, मात्र त्यापूर्वी जो काही प्रकार घडला तो सर्वांनी पाहिला. त्यामुळे ‘जो बूंद से गई वह हौदसे नही आती’ असेच म्हणावे लागेल. यावरून या पक्षांमधील एकतेचा ‘पूल’ किती डळमळीत आहे याचाही प्रत्यय नव्याने आला. राज्यात मराठा व ओबीसी आरक्षण, एसटी कर्मचार्यांचा संप, परीक्षांमधील गोंधळ, पेपरफुटी यांसारखे प्रश्न आ वासून उभे असताना सत्ताधार्यांना त्याचे सोयरसुतक नाही. तिन्ही पक्षांचे नेते खुर्ची सांभाळण्यात, आपापले छुपे अजेंडे राबविण्यात आणि स्वार्थ जपण्यात मश्गूल आहेत. त्यांना जनतेचे काहीएक पडलेले नाही. स्वत: मुख्यमंत्री घराबाहेर पडायला तयार नाहीत. आजारपणाचे कारण दाखवून ते ‘मातोश्री’मधूनच व्हर्च्युअल सफर करीत आहेत. मग त्यांच्या सहकार्यांकडून तरी काय अपेक्षा करणार? ते आपापल्या सोयीनुसार काम करीत असले, तरी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मात्र असा कारभार मान्य नाही. ठाण्यातील खारेगाव येथे उफाळलेला वाद हा त्याचाच एक भाग आहे. नेते मांडीला मांडी लावून बसत असले, तरी स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांना अशी तडजोड मान्य नाही. भविष्यात या कार्यकर्त्यांनी आणखी आक्रमक रूप घेतले तर आश्चर्य वाटायला नको.