Breaking News

पनवेल मनपाच्या काव्यसंमेलनाला प्रतिसाद

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त उपक्रम

पनवेल : प्रतिनिधी

मराठी भाषा गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. 25) प्रेमकवितेतून व्यक्त झालेला प्रियकर, भावकवितेतून व्यक्त होणारी तरुणी, शेतकर्‍यांची वेदना, स्त्रीची आई, मुलगी अशी विविध रूपे कवितेच्या माध्यमातून अनुभवण्याची संधी पनवेल महापालिकेच्या  वरिष्ठ अधिकारी,  कर्मचारी व  नागरिकांना मिळाली.

मराठी भाषा गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात शुक्रवारी काव्य संम्मेलन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रशांत मोरे, भरत दौंडकर, आबेद शेख, अनंत राऊत, राजेंद्र राठोड या कवींनी एकापेक्षा एक दर्जेदार कविता सादर करत रसिकांची भरभरून दाद मिळवली. शब्दालंकारांनी भरलेली ही मैफल कवितेच्या सर्वच प्रकारांना स्पर्श करत उत्तरोत्तर रंगत गेली.

कवी प्रशांत मोरे यांच्या प्रसिद्ध’मैना’कवितेने काव्य संमेलनाचा शेवट झाला. महापालिकेच्या माध्यमातून 14 ते 28 जानेवारी 2022 या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात आला होता. त्यातील स्पर्धांचे बक्षीस वितरण या वेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम व मानचिन्ह या वेळी देण्यात आले.

या वेळी अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त गणेश शेटे, उपायुक्त कैलास गावडे, शहर अभियंता संजय जगताप, कार्यकारी अभियंता संजय कटेकर, मुख्य लेखा अधिकारी मंगेश गावडे, लेखाधिकारी डॉ. संग्राम व्होरकाटे, लेखाधिकारी विनयकुमार पाटील, तसेच पालिका अधिकारी व कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षण विभागाच्या शुभांगी चव्हाण यांनी केले, तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त विठ्ठल डाके यांनी केले. शिक्षणाधिकारी बाबासाहेब चिमणे यांनी मान्यवर कवींची ओळख करून दिली. कार्यक्रमाचे आभार सहाय्यक आयुक्त सुवर्णा दखणे यांनी मानले.

Check Also

पनवेलमध्ये एसआयआरसंदर्भात बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तमतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानासंदर्भात भाजप पनवेल विधानसभा मतदारसंघाचे बीएलए व …

Leave a Reply