Breaking News

सुधागडमध्ये लग्नसोहळ्यात दारू आणि डिजेवर बंदी

21 गणपती पंचक्रोशी मराठा समाजाचा एकमुखी निर्णय

पाली : प्रतिनिधी

लग्नसोहळ्यात दारू व डिजेला बंदी असा निर्णय सुधागड तालुक्यातील सिध्देश्वर येथील 21 गणपती मंदिरात बुधवारी (दि. 23) झालेल्या 11 गाव मराठा समाजाच्या सभेत सर्वानुमते घेण्यात आला. या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे. वाढती महागाई तसेच कोरोनामुळे  रोजगारावरही गदा आल्याने आर्थिक परिस्थिती कोलमडली आहे. गोरगरीब कुटुंबांचा जगण्यासाठी संघर्ष सुरू आहे. आर्थिक दृष्ट्या सधन व सक्षम असलेले लोक लग्नकार्यात दारूपोटी लाखो रुपये उडवतात. लाजेपोटी गरिबांनाही कर्ज काढून दारू ठेवावी लागते. नाहक पैसा जातो. याचा सारासार विचार करून, लग्न समारांभामध्ये दारू बंदी करण्याचा निर्णय सिध्देश्वर भार्जे (ता. सुधागड) पंचक्रोशीतील 11 गाव मराठा समाजाच्या बैठकीत सर्वांनुमते घेण्यात आला. यजमानाने दारू द्यायची नाही, एखादी व्यक्ती दारू पिऊन आल्यास त्याला यजमान जबाबदार राहणार नाही, दारू पिऊन पाहुण्यांनी वादविवाद तंटा केल्यास गाव कमिटीने विषय शांततेच्या पध्दतीने मिटवावा, दारू पिऊन येणार्‍यांना शांत राहण्याचा सल्ला यजमानाने द्यावा अशा प्रकारचे ठरावही सिध्देश्वर येथील 21 गणपती मंदिरात झालेल्या या सभेत मंजूर करण्यात आले. या बैठकीतील चर्चेअंती, ‘लग्न समारंभात डिजे लावायचा नाही‘, असा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे डिजे व्यवसायिक अडचणीत आले आहेत. सदर  निर्णयाच्या अहवालाची प्रत आम्हाला द्यावी, अशी विनंती डिजे मालक संतोष यादव यांनी केली. या निर्णयाची प्रत डिजे मालकांना देण्याचे या बैठकीत ठरले. मराठा समाज सिध्देश्वर भार्जे विश्वस्त कमिटीचे अध्यक्ष रमेश साळंके, उपाध्यक्ष अमृत पोंगडे, सेक्रेटरी गणेश दळवी, खजिनदार शंकर शिंदे, सदस्य गणपत सितापराव, चंद्रकांत चव्हाण, विश्वनाथ कदम, दगडू कदम, सतिश खाडे, मारूती हरी यादव, सखाराम राजिवडे, सागर अजिवळे, प्रकाश कदम, नथुराम भोईर, श्री क्षेत्र एकवीस गणपती सिध्देश्वर भार्जे विभागातील ग्रुप मराठा समाजाचे अध्यक्ष अशिष यादव, उपाध्यक्ष गणपत तेलंगे, सचिव महिपत जांभूळकर, खजिनदार वामन कालेकर, सदस्य गणपत चव्हाण, महादू दळवी, दीपक जाधव, गोपाळ सावंत, सप्ताह कमिटी अध्यक्ष यशवंत घोलप, उपाध्यक्ष मंगेश यादव, सेक्रेटरी राजू दळवी, खजिनदार दगडू कदम यांच्यासह 11 गाव ग्रामस्थ या सभेला होते.

Check Also

नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस …

Leave a Reply