Breaking News

कर्जतमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार

10 आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी

कर्जत ः बातमीदार

तालुक्यातील गौरकामत गावातील एका अल्पवयीन शालेय विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची घटना सोमवारी (दि. 18) समोर आली. काही तरुणांनी इन्स्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर या शाळकरी मुलीची फसवणूक करून बलात्कार केला असून या प्रकरणी कर्जत पोलिसांनी 20 ते 30 वयोगटातील 10 तरुणांना ताब्यात घेतले. या प्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या सर्व आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गौरकामत गावातील 13 वर्षीय शाळकरी मुलीचे इन्स्टाग्रामवर अकाउंट होते. या अकाउंटद्वारे या मुलीची त्याच गावातील काही तरुणांशी ओळख झाली. मार्च 2021 ते डिसेंबर 2021 या कालावधीत या मुलीसोबत त्या तरुणांनी मैत्री करून ओळख वाढवली आणि तिच्याकडे विविध प्रकारच्या मागण्या करू लागले तसेच तिचे अश्लील फोटो इन्टाग्राम अकाउंटवर शेअर करू लागले. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील अनेक तरुणांचे तिला अश्लील संदेश येत असल्याचे त्या मुलीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याबाबत पीडित शाळकरी मुलीने विरोध केला असता तिला जीवे ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचे तक्रारीत त्या मुलीने सांगितले. या सर्व प्रकारामुळे त्या मुलीबद्दल गावात बदनामी सुरू झाल्याने अखेर सोमवारी (दि. 18) कर्जत पोलीस ठाणे गाठून तिने आपल्यावर अनेकांनी बलात्कार केल्याची तक्रार कर्जत पोलीस ठाण्यात पालकांसह जाऊन केली. याबाबत तत्काळ पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आणि त्या शालेय मुलीच्या तक्रारीनुसार 10 तरुणांना रात्रीच ताब्यात घेतले. गौरकामत गावातील आठ आणि शिरसे तसेच जांभिवली गावातील प्रत्येकी एक अशा 10 तरुणांवर पोलिसांनी बलात्कार आणि अल्पवयीन मुलीची फसवणूक केल्याप्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यातील सर्व 10 आरोपींना कर्जत पोलिसांनी मंगळवारी (दि. 19) पनवेल येथील जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी कर्जतमध्ये येऊन उपअधीक्षक विजय लगारे, या गुन्ह्याच्या तपास अधिकारी निरीक्षक सुवर्णा पत्की यांना सूचना केल्या. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Check Also

पनवेलमध्ये एसआयआरसंदर्भात बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तमतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानासंदर्भात भाजप पनवेल विधानसभा मतदारसंघाचे बीएलए व …

Leave a Reply