गौरव प्रस्ताव नाकारल्याने राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी
मुंबई : प्रतिनिधी
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बुधवारी (दि. 26) विधिमंडळात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या गौरव प्रस्तावावरून खडाजंगी झाली. सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त राज्य सरकारने त्यांच्या गौरवाचा प्रस्ताव मांडावा, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली होती, मात्र विधानसभा अध्यक्षांनी हा प्रस्ताव नाकारला. त्यामुळे भाजपकडून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबतची भूमिका मांडली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्याला अनुमोदन दिले, तसेच सावरकरांची बदनामी करणारे काँग्रेसचे मुखपत्र असलेल्या ‘शिदोरी’ मासिकावर बंदी आणण्याचीदेखील मागणी केली. तत्पूर्वी विधानसभेच्या पायर्यांवरही भाजपने सावरकरांच्या गौरवाचा मुद्दा लावूून धरला होता.
‘दिशा कायदा लागू करा’
आंध्र प्रदेशच्या धर्तीवर राज्यात महिला अत्याचारविरोधी दिशा कायदा लागू करावा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. त्यावर नवा कायदा तयार केला जात असून यात आरोपीला थेट फाशीची तरतूद असेल, असे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.