Breaking News

अखेर राष्ट्रपतिपदासाठी शिवसेनेचा दौपदी मुर्मू यांना पाठिंबा

खासदारांच्या वाढत्या दबावानंतर उद्धव ठाकरे यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रपतिपदासाठी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना अखेर शिवसेनेने पाठिंबा जाहीर केला आहे. तशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी (दि. 12) पत्रकार परिषद घेत केली.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या सत्तानाट्यामध्ये येत्या 18 जुलै रोजी होणार्‍या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीवरूनही चर्वितचर्वण सुरू होते. राज्यात घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेमका कुणाला पाठिंबा देणार यावरून तर्क-वितर्क लढवले जात होते.
दरम्यान, शिवसेनेच्या अनेक खासदारांनी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पक्षाने पाठिंबा द्यावा, अशी मागणी केली होती. याबाबत वाढता दबाव आणि राज्यातील बदललेली परिस्थिती पाहून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले.
पहिल्यांदा आदिवासी समाजातील व्यक्तीला राष्ट्रप्रमुख बनण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे सर्वांना मान ठेवून आणि लोकांनी केलेल्या आग्रहाचा आदर करून शिवसेना द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देत आहे, असे उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

Check Also

कर्जतमध्ये तिहेरी हत्याकांड

जमिनीच्या वादातून कुटुंबातील तिघांचा खून; संशयित तरुण पोलिसांच्या ताब्यात कर्जत, नेरळ : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील …

Leave a Reply