Breaking News

शिवसेना खासदारांमध्येही उभी फूट

12 जणांची शिंदे गटाच्या बैठकीला उपस्थिती

मुंबई : प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षाला गळती लागली आहे. शिवसेनेचे अनेक आमदार, आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्तेदेखील शिंदे गटात सहभागी झाले आहेत. यानंतर आता शिवसेनेच्या खासदारांमध्ये फूट पडली असून 12 खासदार सोमवारी (दि. 18) मुख्यमंत्री शिंदे यांनी बोलाविलेल्या बैठकीला उपस्थित होते. शिवसेना व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
मागील काही दिवसांपासून शिवसेनेचे खासदारदेखील फुटणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) उमेदवार द्रौपदी मूर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी मागणी सेनेच्या खासदारांकडून करण्यात आली होती. याबाबत शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र दिले होते.
शिवसेना खासदारांच्या मनात सुरू असलेली खदखद लक्षात घेत उद्धव ठाकरेंनी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार द्रौपदी मूर्मू यांना पाठिंबा दिला. त्यानुसार सोमवारी राष्ट्रपतिपदासाठीची मतदान प्रक्रिया पार पडली, पण या मतदानानंतर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला. शिवसेनेच्या 12 खासदारांनी शिंदे गटाच्या बैठकीला हजेरी लावल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये राहुल शेवाळे (मुंबई दक्षिण मध्य), भावना गवळी (यवतमाळ-वाशिम), श्रीरंग बारणे (मावळ), हेमंत गोडसे (), राजेंद्र गावित (पालघर), धैर्यशील माने (हातकणंगले), संजय मंडलिक (कोल्हापूर), सदाशिव लोखंडे (शिर्डी), संजय जाधव (परभणी), प्रतापराव जाधव (बुलडाणा), कृपाल तुमाने (रामटेक), हेमंत पाटील (हिंगोली) यांचा समावेश होता, असे सांगितले जात आहे.
राष्ट्रपतिपदाच्या मतदानानंतर शिंदे गटाची बैठक मुंबईत हॉटेल ट्रायडंटमध्ये झाली. या बैठकीला शिवसेनेच्या 12 खासदारांनी ऑनलाइन पद्धतीने हजेरी लावली. या बैठकीत जवळपास अर्धा तास चर्चा झाली. या वेळी गटनेतेपदासाठी राहुल शेवाळे आणि मुख्य प्रतोदपदासाठी भावना गवळी यांच्या नावाची चर्चादेखील झाल्याची माहितीदेखील समजते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या खासदारांचा नवीन गट स्थापन करण्याच्या तयारीत असून त्याबाबत चर्चा करण्यासाठी ते दिल्लीला रवाना होणार असल्याचेही कळते. याबाबतचे पत्र मंगळवारी लोकसभा अध्यक्षांना देण्यात असल्याचेही सूत्रांची माहिती आहे.
शिंदे गटाला मिळणार्‍या पाठिंब्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आमदारांपाठोपाठ नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, मीरा भाईंदर, बदलापूर, रत्नागिरी येथील अनेक नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. सोबतच पदाधिकारीही दाखल झाले. यानंतर आता शिवसेनेच्या 14 खासदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी
मुंबई ः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतील हॉटेल ट्रायडंटमध्ये समर्थक आमदारांची बैठक सोमवारी (दि. 18) झाली. या बैठकीत शिंदे गटाने शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर केली. मुख्यमंत्री शिंदे यांची शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून एकमताने निवड करण्यात आली आहे.
नव्या कार्यकारिणीत दीपक केसरकर यांची प्रवक्तेपदी, तर नेतेपदी रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची निवड केल्याची घोषणा करण्यात आली आहे. कदम यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर कदमांसह आनंदराव अडसूळ यांचीही पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर लगेचच शिंदे गटाने या दोघांना नेतेपद दिले आहे. याशिवाय उपनेतेपदी यशवंत जाधव, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शरद पोंक्षे, तानाजी सावंत, विजय नहाटा, शिवाजीराव आढळराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Check Also

राज्यस्तरीय 11व्या अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन

विजेत्या एकांकिकेला एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ …

Leave a Reply