Breaking News

आषाणे धबधबा ठरतोय गर्दीचे केंद्र

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील भिवपुरी रोड रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या आषाणे येथील धबधबा पर्यटकांचे आकर्षण बनला आहे. हा धबधबा पावसाळ्यातील चार महिन्यात लाखो पर्यटकांना आपल्याकडे खेचून घेण्यात यशस्वी ठरतो. त्याबरोबरच हा धबधबा अनेकांच्या उदरनिर्वाहाचे साधनही ठरला आहे.

कर्जत-कल्याण रस्त्यावर आषाणे गावाच्यामागील बाजूस असलेल्या डोंगरावरून उडणारे पाण्याचे तुषार  झेलण्यासाठी पर्यटक वर्षा सहलीच्या निमित्ताने इकडे येतात. या धबधब्याचे आकर्षण म्हणजे डोंगरावरून उतरणारे फेसाळणार्‍या पाण्याचे तीन प्रवाह. तेथे जाणे सहज शक्य असल्याने पर्यटक या ठिकाणी गर्दी करतात. लोकल ट्रेनने आलेल्या पर्यटकांचे पाय उमरोली गावातून या धबधब्याकडे वळतात. या रस्त्याने जाताना एक लहान ओढा लागतो. तो पार करताना गतवर्षी एका चिमुरडीसह दोघांचा बळी गेला होता.

या धबधब्याच्या डोहात बसून कुटुंबासह आलेले पर्यटक वर्षा सहलीचा आनंद घेऊ शकतात. मात्र मुख्य डोहात कोसळणार्‍या पाण्यासोबत अनेकदा दगड वाहून येतात. हे दगड धबधब्याखाली असलेल्या पर्यटकांच्या डोक्यात पडून अपघात होऊ शकतो. अन्य कुठेही या धबधब्यावर धोका नसल्याने पर्यटक कुटुंबकबिल्यासह वर्षा सहलीचा आनंद घेण्यासाठी आषाणे धबधब्यावर येतात.

या धबधब्यावर येणार्‍या पर्यटकांना उमरोली आणि आषाणे गावात रुचकर, गावरान पद्धतीचे जेवण सहज उपलब्ध होते. डिकसळ नाक्यावरील गरमागरम वडे, भजी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे पावसात भिजल्यानंतर त्याची चवदेखील सहज घेता येते. चहा, कॉफी आणि मक्याची कणसे सोबतीला असतात.

सध्या आषाणे येथील धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहीत झाला आहे. त्यामुळे सुटीच्या दिवशी, वीकेण्डला येथे हजारोच्या संख्येने पर्यटक येत आहेत.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांना महाराष्ट्र प्रदेश भाजप चिटणीसपदाची मोठी जबाबदारी

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा …

Leave a Reply