Breaking News

मुंबई-पुणे महामार्गावर लवकरच ‘इंटिलिजेंट मॅनेजमेंट ट्राफिक सिस्टीम’

‘एमएसआरडीसी’कडून कार्यादेश जारी; वाहनचालकांवर राहणार करडी नजर

मुंबई : प्रतिनिधी

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ (आयटीएमएस) लवकरच बसविण्यात येणार आहे. एमएसआरडीसीने यासंबंधीचे कार्यादेश संबंधित कंपनीला दिले आहेत. दरम्यान, महामार्गावर नऊ महिन्यांमध्ये यंत्रणा बसविण्यात येणार असून त्यानंतर महिन्याभर या यंत्रणेची चाचणी घेण्यात येणार आहे. एकूणच वर्षभरात अत्याधुनिक अशी ‘आयटीएमएस’ यंत्रणा कार्यान्वित होऊन वाहतुकीला शिस्त लागेल, वाहनचालकांवर करडी नजर राहील आणि अपघात रोखले जातील असा विश्वास एमएसआरडीसी कडून व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून 94 किमी लांबीच्या या द्रुतगती मार्गावरून दररोज अंदाजे 60 हजार वाहने धावतात. या मार्गासाठी वेगमर्यादा निश्चित करण्यात आली असून कडक नियमही घालण्यात आले आहे. मात्र वाहनचालकांकडून वेगमर्यादा आणि नियमांचे पालन होत नाही. तसेच वाहतूक नियंत्रणासाठी सज्ज यंत्रणा अपुरी पडत आहे. त्यामुळे द्रुतगती मार्गावरील अपघातांचे प्रमाण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘एमएसआरडीसी’ने येथे अत्याधुनिक अशी ‘आयटीएमएस’ यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला आहे.

सार्वजनिक-खासगी सहभागातून हा प्रकल्प राबविण्यात येणार असून यासाठी अंदाजे 160 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. द्रुतगती मार्गावर वाहतूक शिस्त पाळली जावी, अपघात टाळवे, अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळावी, तसेच टोल वसुली जलद, अचूक, तसेच पारदर्शक पद्धतीने व्हावी यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणा बसविण्यात येणार आहे. संपूर्ण मार्गावर अत्याधुनिक सीसी टीव्ही कॅमेरे, 39 ठिकाणी वाहनांचा वेग तपासणारी ‘ऍवरेज स्पीड डीटेक्शन सिस्टीम’, तर 34 ठिकाणी वाहतुकीचे नियम मोडणार्‍यांचा शोध घेणारी ‘लेन डिसीप्लेन व्हायलेशन डिटेक्शन सिस्टीम’ बसविण्यात येणार आहे. दरम्यान प्रकल्पाचे कार्यादेश 3 ऑगस्ट रोजी देण्यात आल्याची माहिती ‘एमएसआरडीसी’चे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी दिली. एका कंपनीला हे कंत्राट देण्यात आले असून आता अवघ्या काही दिवसांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. करारानुसार हे काम नऊ महिन्यांमध्ये पूर्ण करावे लागणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर महिनाभर यंत्रणेची चाचणी घेण्यात येणार आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून वर्षभरात महामार्गावर ‘आयटीएमएस’ यंत्रणा प्रत्यक्षात कार्यान्वित होईल असेही मोपलवार यांनी सांगितले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply