Breaking News

विराट कोहली झाला अलिबागकर!

झिराड परिसरात खरेदी केला भूखंड; फार्महाऊस बांधणार

अलिबाग # प्रतिनिधी
भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने गणपतीच्या मुहूर्तावर अलिबागमध्ये जमीन खरेदी केली आहे. झिराड परिसरात ही आठ एकर हवेशीर जागा असून या ठिकाणी तो फार्महाऊस बांधणार आहे. विराटचा भाऊ विकास कोहलीने हा व्यवहार गणपतीच्या आदल्या दिवशी मंगळवारी (दि. 30) पूर्ण केला.
सहा महिन्यांपूर्वी विराट कोहली आणि पत्नी अनुष्का शर्मा यांनी झिराड येथे येऊन जागेची पाहणी केली होती. क्रिकेटच्या व्यस्त कार्यक्रमामुळे विराटला अलिबागमध्ये येऊन जागेचा व्यवहार पूर्ण करता येत नव्हता. सध्या तो आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी दुबईत आहे. त्यामुळे गणपतीचा आदल्या दिवसाचा मुहूर्त साधत लहान भाऊ विकासने पॉवर ऑफ अटर्नीद्वारे विराटसाठी व्यवहार पूर्ण केला.
विकासने निबंधक कार्यालयात उपस्थित राहून हा व्यवहार रजिस्टर केला. या आठ एकर जमीन खरेदी-विक्रीची कागदपत्रे अलिबाग येथील सह दुय्यम निबंधक अश्विनी भगत यांच्याकडे नोंदणीकृत करण्यात आली. या जमिनीची एकूण किंमत 19 कोटी 24 लाख 50 हजार रुपये असून यापोटी तीन लाख 35 हजार रेडीरेकनरनुसार एक कोटी 15 लाख 45 हजार रुपयांची स्टॅम्प ड्युटी सरकारच्या तिजोरीत जमा झाली आहे. रियल इस्टेटमधील नावाजलेल्या समिरा हॅबिटॅट्स या कंपनीने हा व्यवहार केला.
या व्यवहारानंतर रवी शास्त्री, रोहित शर्मा यांच्यापाठोपाठ आता विराट कोहलीही अलिबागकर होणार आहे. उद्योजक, सिने कलाकारांबरोबरच क्रिकेटपटूंनाही अलिबागच्या निसर्गरम्य परिसराची भूरळ पडत आहे. म्हात्रोळी -सारळ परिसरात रोहितच्या तीन एकरमधील फार्महाऊसचे काम चालू असल्याची माहिती या फार्महाऊसचे बांधकाम करणारे अमित नाईक यांनी दिली.
याव्यतिरिक्त हार्दिक पांड्या, युजर्वेंद्र चहल हेदेखील काही दिवसांपासून जागेचा शोध घेत अलिबागमध्ये पोहचले होते. यावरून क्रिकेट, सिनेकलाकार, उद्योजकांची अलिबागला असणारी पसंती दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply