या घटनेचे राजकारण होऊ नये -डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी
अलिबाग : प्रतिनिधी
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी खारघर येथे आलेल्या काही श्री सदस्यांचा दुर्दैवाने उष्माघातामुळे मृत्यू झाला. हे माझ्यासाठी अत्यंत क्लेषदायक आहे. आपल्याच कुटूंबातील लोकांवर घाला येण्याच्या या घटनेने मी व्यथित आहे, पण या घटनेचे कोणत्याही पद्धतीने राजकारण होऊ नये, अशी अपेक्षा ज्येष्ठ निरूपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी व्यक्त केली आहे.
खारघर येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी आपल्या आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासानाने आयोजित केलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी खारघर येथे आलेल सारे श्री सदस्य हे माझ्या कुटुंबाचे सदस्य आहेत. श्री सदस्यांचा हा परिवार देश-विदेशात पसरला आहे. या पुरस्कार सोहळ्यावेळी उष्माघाताने काही श्री सदस्यांना त्रास झाला आणि त्यातील काहींचा दुर्दैवाने मृत्यू झाला. ही घटना माझ्यासाठी अत्यंत क्लेषदायक आहे. माझ्या कुटूंबातीलच सदस्यांवर कोसळलेली ही आपत्ती आहे. आपल्याच कुटूंबातील लोकांवर घाला येण्याच्या या घटनेने मी व्यथित आहे. माझे हे दुःख शब्दांत व्यक्त करण्यापलिकडचे आहे. मृत्यू झालेल्या या सदस्यांच्या कुटूंबीयांची आणि माझी वेदना सारखीच आहे.
श्री सदस्य परिवाराची एकमेकांच्या सोबत राहण्याची पिढ्यान् पिढ्यांची परंपरा आहे त्यानुसार आम्ही सारेजण या आपदग्रस्तांसोबत कायम आहोत. यातील मृतांना सद्गती लाभो तसेच त्यांच्या कुटूंबाला हा आघात सहन करण्याची शक्ती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. झाला प्रकार दुर्दैवीच होता. त्याचे कोणत्याही पद्धतीने राजकारण होऊ नये, अशी आमची अपेक्षा आहे, असेही डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी नमूद केले आहे.