मुरूड : प्रतिनिधी
रेशन दुकानदारांच्या पॉस मशीनचे सर्व्हर गेल्या पंधरा दिवसांपासून डाऊन असल्याने मुरूड तालुक्यातील धान्य वितरण व्यवस्था कोलमडली आहे. याचा फटका शेकडो रेशनकार्डधारकांना बसत आहे. या प्रकारबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
आधार क्रमांकानुसार मुरूड तालुक्यातील सर्व रेशन कार्डाची नोंदणी पॉस मशीनमध्ये करण्यात आली आहे. सर्व पॉसमशीन एका लहान अँटिनाद्वारे ऑनलाइन सर्व्हरला जोडल्या आहेत, मात्र मागील पंधरा दिवसांपासून सर्व्हर डाऊन होत असल्यामुळे तालुक्यातील धान्यवाटपाचे काम ठप्प आहे. धान्याचा कोटा सर्व दुकानदारांनी आणून ठेवला आहे, मात्र ग्राहक दुकानात चकरा घालून, खाली हाताने परत जात आहेत.
मुरूड शहरात चार तर ग्रामीण भागात एकूण 28 रेशन दुकाने आहेत. शासनाने संपूर्ण धान्य वाटप ’ऑनलाइन’ केल्यामुळे धान्य दुकानदारांना ’ऑफलाइन’ धान्यवाटप करता येत नसल्याने सामान्य जनतेमधून तीव्र असंतोष व्यक्त होत आहे.
शहरातील रास्त भाव दुकानदारांनी सांगितले की, गेल्या पंधरा दिवसांपासून दुकानातील सर्व्हर सुरळीत चालत नाही. यांचा परिणाम पॉस मशीनवर झाला आहे. रेशनधारकांचा थम घेण्यासाठी वेळ लागत आहे. कधी कधी थम होत नाही. परिणामी रेशनकार्डधारकांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. त्यामुळे आम्हाला रेशनधारकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. लवकरात लवकर सर्व्हरची समस्या दूर करावी, अशी मागणी तहसीलदार कार्यालयात केली आहे.
Check Also
छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा उभारणी व सुशोभीकरण समितीची बैठक
शिवसृष्टीच्या उभारणी कामाला लवकरच होणार सुरुवात पनवेल ः रामप्रहर वृत्तमुंबईतील शिवाजी पार्कच्या धर्तीवर उलवे नोडमध्ये …