Breaking News

पंतप्रधान मोदींकडून 71 हजार जणांना नोकरीची नियुक्तीपत्रे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (दि. 22) रोजगार मेळाव्यांतर्गत तब्बल 71 हजार तरुणांना नियुक्तीपत्र दिले. शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, नर्स, नर्सिंग ऑफिसर, फार्मासिस्ट्स, रेडिओग्राफर्स अशा अनेक तांत्रिक आणि पॅरामेडिकल पदासाठी ही नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींनी नियुक्तीपत्रे देण्यात आलेल्या तरुणांशी संवादही साधला.
तरुणाईच्या हाताला काम मिळावे यासाठी केंद्र सरकारने रोजगार मेळावा या नावाने उपक्रम सुरू केला आहे. रोजगार मेळाव्यातंर्गत देशभरातील जवळपास दहा लाख युवकांना नियुक्तीपत्रे देऊन त्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्यात येणार आहे. केंद्र सरकारकडून वाटप करण्यात येत असलेल्या नियुक्ती पत्रांमध्ये यूपीएससी, एसएससी, रेल्वे भरती बोर्ड यांसारख्या अनेक विभागांचा समावेश आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून ऑक्टोबर महिन्यात केंद्र सरकारकडून 75 हजार तरुणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून रोजगारासाठी प्राधान्य दिले जात असून त्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी हा उपक्रम राबविला जात असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. या उपक्रमाच्या दुसर्‍या टप्प्यांतर्गत 71 हजार तरुणांना नियुक्तीपत्र देण्यात आले. या रोजगार मेळाव्यात केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.
भारत हे जगाचे उत्पादन केंद्र बनणार
या वेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे साधलेल्या संवादातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून केंद्र सरकारने तरुणांना सरकारी नोकरी देण्याचा उपक्रम राबवायला सुरुवात केलेली आहे. भारत हे जगाचे उत्पादन केंद्र बनणार असून सरकारने मोठ्या प्रमाणात नोकर्‍या निर्माण करण्याची संधी दिली आहे. तरुणाई या देशाची सर्वांत मोठी ताकद आहेत. देशाच्या विकासात त्यांचे कौशल्य वापरले जावे याला सरकारकडून प्राधान्य दिले जात आहे. यासाठी रोजगार मेळाव्याची मदत होईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

Check Also

मोहोपाड्यात रविवारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संवाद मेळावा

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष उरण विधानसभेच्या वतीने रविवारी (दि. 14) सकाळी 10.30 …

Leave a Reply