अलिबाग : प्रतिनिधी
राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने पनवेल खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयात रविवारी (दि. 1 जानेवारी 2023) सकाळी 10 वा. जिल्हास्तरीय युवा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
केंद्र शासनाच्या युवक कल्याण विभागाच्या वतीने राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयेाजन करण्यात येते. त्यापूर्वी राज्यस्तरीय युवा महोत्सव महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजिला जातो. राज्यस्तरीय युवा महोत्सवामध्ये सहभागी होण्याची संधी रायगड जिल्ह्यातील युवक-युवतींना या युवा महोत्सवामधून मिळणार आहे.
युवा महोत्सवात लोकगीत व लोकनृत्य या कला बाबींचा समावेश राहील. लोकगीतामध्ये सहभागी होणार्या संघामध्ये साथसंगतसह 10 कलाकार सहभागी होऊ शकतील. सादरीकरणासाठी त्यांना 7 मिनिटे वेळ देण्यात येईल. लोकनृत्यामध्ये सहभागी होणार्या संघामध्ये साथसंगतसह 20 कलाकार सहभागी होऊ शकतील व त्यांना सादरीकरणासाठी 15 मिनिटे वेळ देण्यात येईल.
सर्व युवक-युवतींचे वय 15 ते 29 वर्षादरम्यान असणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांचा जन्म 12 जानेवारी 1994 ते 12 जानेवारी 2008 या कालावधीत झालेला असावा. स्पर्धा ठिकाणी संघांची प्रवेशिका भरुन सादर करावी लागेल. स्पर्धेसाठी येताना आधार कार्ड/जन्मतारखेचा दाखला/बोर्ड प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र यापैकी एक कादगपत्र जोडणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी क्रीडा अधिकारी सचिन निकम (8856093608) यांच्याशी संपर्क साधावा आणि जिल्ह्यातील जास्तीत जास्त संघांनी, महाविद्यालयांनी या महोत्सवात सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी केले आहे.
Check Also
पनवेलच्या झोपडपट्टी पुनर्वसनासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचा पाठपुरावा
मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा आणि त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न …
RamPrahar – The Panvel Daily Paper