Breaking News

नवी मुंबईत स्वच्छतेचा दर्जा उंचावणार

झोकून काम करण्याचे आयुक्तांचे निर्देश

नवी मुंबई : बातमीदार

नवी मुंबई महापालिकेने शहर स्वच्छतेमध्ये एक स्तर गाठला असून आता त्यामध्ये अधिक सुधारणा करत आणखी उच्चस्तर गाठण्यासाठी काटेकोरपणे प्रयत्न करायला हवेत आणि अतिशय जागरूकतेने इतर शहरांमध्ये सुरू असलेल्या स्वच्छता कामांचा अंदाज घेत आणखी उत्तम दर्जाची स्वच्छता राखायलाच हवी, असे स्पष्ट निर्देश महापालिका आयुक्त (अतिरिक्त कार्यभार) अभिजित बांगर यांनी स्वच्छता विषयक आढावा बैठकीवेळी दिले. राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत नवी मुंबईची स्वच्छता स्थिती चांगली असली तरी आता प्रत्येक शहरात जागरुकता आली आहे याची जाणीव ठेवून स्वच्छता ही नियमित करण्याची गोष्ट आहे याचे भान राखावे आणि आपली गुणवत्ता अधिक उंचाविण्यासाठी दुर्लक्ष करू नये, असे आयुक्तांनी निर्देशित केले. स्वच्छता कामाशी संबंधित प्रत्येकाने आपला अधिकाधिक वेळ हा क्षेत्रीय स्तरावर कामातील गुणवत्ता वाढीसाठी दिला पाहिजे असे स्पष्ट करीत त्यानुसार कामाच्या वेळेचे नियोजन करावे अशा सूचना आयुक्तांनी दिल्या. या वेळी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले व  संजय काकडे, शहर अभियंता संजय देसाई, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे आणि इतर अधिकारी उपस्थित होते. शहरातील वर्दळीच्या भागांची दोन वेळा स्वच्छता केली जाते ही नागरिकांच्या दृष्टीने अतिशय समाधानकारक गोष्ट असून विभाग अधिकार्‍यांनी रात्रीचे दौरे करून या कामाचे नियमित परीक्षण करावे असे सूचित करीत आयुक्त अभिजित बांगर यांनी फूट जॉईंटच्या ठिकाणी विशेष लक्ष द्यावे व तेथील स्टॉल धारकांना ओला व सुका कचर्‍यासाठी स्वतंत्र डबे ठेवणे अनिवार्य करावे, असेही निर्देशित केले. स्वच्छता परीक्षणासाठी विभागवार नेमलेल्या विभागप्रमुख स्तराच्या नोडल अधिकार्‍यांनी आपापल्या विभागात दौरे सुरु करावेत व स्वच्छतेमध्ये सुधारणा होईपर्यंत त्या कामांचा पाठपुरावा करावा, असेही आयुक्तांनी निर्देश दिले. घराघरातून कचरा वर्गीकरण हे आपले प्रमुख लक्ष्य असून त्यादृष्टीने आपली क्षमता वाढवा तसेच मोठ्या प्रमाणावर कचरा निर्मिती होते अशा सोसायट्या, हॉटेल्स, संस्था याठिकाणी ‘बल्क वेस्ट जनरेटर प्रकल्प’ राबविण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहचून त्यांची संख्या वाढविण्याची व्यापक स्वरुपात कार्यवाही करावी असेही आयुक्तांनी निर्देशित केले. कचरा निर्माण होतो त्याच ठिकाणी त्याची विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने ‘झिरो वेस्ट मॉडेल’ हा अत्यंत प्रभावी उपक्रम असून त्यामध्ये नवी मुंबई आघाडीवर आहे याचा अभिमान बाळगताना त्याची व्याप्ती वाढवून प्रत्येक झोपडपट्टीत झिरो वेस्ट स्लम मॉडेल राबविण्यासाठी गतीमान कार्यवाही करावी असेही आयुक्तांनी निर्देश दिले. स्वच्छता ही नवी मुंबईची ओळख असून आपली बलस्थाने ओळखून ती अधिक सक्षम करण्यासाठी नियोजनबध्द पावले उचलण्याच्या सूचना आयुक्तांनी या वेळी दिल्या. सार्वजनिक शौचालये नागरिकांना दररोज वापरावी लागत असल्याने तेथील स्वच्छतेमध्ये किंचीतही तडजोड खपवून घेतली जाणार नाही हा दृष्टीकोन ठेवून सार्वजनिक व सामुदायिक शौचालयाच्या स्वच्छतेकडे बारकाईने लक्ष द्यावे तसेच त्याबाबतची जबाबदारी निश्चित करून त्या कामात निष्काळजीपणा आढळल्यास कारवाई करावी असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. शहरातील नागरिकांना आपल्या बांधकाम, पाडकामाच्या डेब्रीजची सुयोग्य विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने सुरू करून दिलेली ‘डेब्रीज ऑन कॉल’ सुविधा अधिक कार्यक्षम करून त्यासाठी उपलब्ध करून दिलेला 8898017009 या मोबाईल नंबर जास्तीत जास्त प्रसारित करावा असेही निर्देश आयुक्तांनी दिले. यासोबतच महानगरपालिकेचा सी अ‍ॅण्ड डी वेस्ट प्रकल्प अधिक सक्षम करण्यासाठी उपाययोजना कराव्यात असेही आयुक्तांनी सूचित केले.  प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहिमांनी आता वेग घेतला असला तरी त्या नियमित सुरू ठेवून त्यासोबतच सोसायट्यांमध्ये प्लास्टिक पिशव्यांना आत नेण्यास मनाई, महानगरपालिकेच्या दैनंदिन बाजारांमध्ये प्लास्टिक पिशव्यांना प्रतिबंध अशी विशेष परिणामकारक ठरणारी कार्यवाही सुरू करावी, असे निर्देश आयुक्तांनी दिले.

नागरिकांचा सहभाग गरजेचा

उद्यानांचे शहर म्हणून नवी मुंबई नावाजली जात असून नागरिकांना विनामूल्य उपलब्ध असणारी उद्यानांसारखी विरंगुळ्याची ठिकाणे सर्वोत्तम राहतील याची काटेकोर काळजी घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. स्वच्छ व सुशोभित शहर ही नवी मुंबईची ओळख असून ती टिकविण्यासाठी व वाढविण्यासाठी प्रत्येक घटकाने आपली जबाबदारी ओळखून काम करण्याची गरज विषद करीत महापालिका आयुक्त बांगर यांनी शहर स्वच्छतेबाबत अधिक सतर्क राहून क्षेत्रीय स्तरावर जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचून व विविध उपक्रमांत त्यांचा सहभाग घेऊन शहर स्वच्छतेची उंची वाढवावी, असे निर्देश दिले.

Check Also

नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस …

Leave a Reply