Breaking News

बोरघाटात विद्यार्थ्यांच्या बसला अपघात; झाडामुळे अनर्थ टळला

सर्व जण सुखरूप

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी
मुंबई चेंबूर येथील खासगी क्लासच्या बसला लोणावळा-खोपोली असा नो एण्ट्रीमधून केलेला प्रवास जीवघेणा ठरला असतानाच शुक्रवारी (दि. 6) त्याच घटनेची पुनरावृत्ती होता होता वाचली. मानव व यंत्र कुचकामी ठरले असताना एका झाडामुळे 64 विद्यार्थी व सहा शिक्षकांचे प्राण बालंबाल वाचले. डोंबिवलीतील विद्यार्थ्यांच्या सहलीच्या या बसला बोरघाटातील शिंग्रोबा मंदिराच्या पाठीमागील खिंडीत दुपारी 1च्या सुमारास हा अपघात घडला.
डोंबिवली कोपर येथील च. रु. बामा म्हात्रे विद्यालयाची बस (एमएच 04 एचवाय 3571) तिसरी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना घेऊन कार्ला येथून एकविरा आईचे दर्शन घेतल्यानंतर खोपोलीतील गगनगिरी आश्रमाकडे येत होती. मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरून बस नो एण्ट्रीमार्गे बोरघाटातून खोपोलीकडे येत असताना शिंग्रोबा मंदिराच्या पाठीमागील खिंडीत तीव्र उतारावर बसचा ब्रेक फेल झाला. ही बस समोरील झाडाला धडकून थांबल्याने मोठी दुर्घटना टळली; अन्यथा बस दरीत कोसळली असती. या दुर्घटनंतर काळ आला होता, पण वेळ आली नव्हती असेच म्हणावे लागेल.
या अपघाताची माहिती मिळताच खोपोली पोलीस, बोरघाट पोलीस, अपघातग्रस्तांना मदत करणार्‍या ग्रुपचे सदस्य तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बसमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढून त्यांना खोपोलीतील गगनगिरी आश्रमाकडे रुग्णवाहिकेद्वारे रवाना केले. या घटनेबाबत खोपोली पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply