क्षात्रैक्य कृषक महोत्सवास सुरुवात
अलिबाग ः प्रतिनिधी
आजच्या पिढीला शेतीत रस नाही. त्यांना चांगल्या पगाराच्या नोकर्या हव्या आहेत, परंतु शेतीदेखील चांगले क्षेत्र आहे. त्यात मनापासून काम केले तर चांगले उत्पन्न मिळू शकते, परंतु केवळ शेती करून चालणार नाही. शेतीला पुरक व्यवसायदेखील केले पाहिजेत, असे प्रतिपादन राज्याचे सहकार आणि ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केले. क्षात्रैक्य समाज अलिबागतर्फे अलिबाग तालुक्यातील आवास येथे क्षात्रैक्य कृषक महोत्सव शुक्रवार (दि. 6)पासून सुरू झाला. चार दिवस चालणार्या या महोत्सवाचे उद्घाटन अतुल सावे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. द्वारकानाथ नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्घाटन सोहळ्यास आमदार मनिषा चौधरी, माजी आमदार डॉ. चंद्रकांत मोकल, स्वागताध्यक्ष अभिजित राणे, रणजित राणे, सुरेंद्र म्हात्रे, कृषीभूषण जयंत चौधरी, समाजाचे अध्यक्ष अविनाश राऊळ, प्रदीप नाईक आदी उपस्थित होते.शुक्रवारी सकाळी कृषीदिंडीने महोत्सवाची सुरुवात झाली. शेकडो क्षात्रैक्य बांधव भगिनी पारंपारीक वेषात या दिंडीत सहभागी झाले होते. यात विविध विभागातून सहभागी चित्ररथ आकर्षण ठरले. या मेळाव्यातून तरूणांना नक्कीच प्रेरणा मिळेल, असे अतुल सावे म्हणाले. सरकारने सहकार खात्याला 900 कोटी रुपये दिले. त्यातून शेतकर्यांच्या जमिनीच्या 7/12 कोरा केला. जवळपास 69 हजार हेक्टर जमीन बोजामुक्त करू शकलो, अशी माहिती त्यांनी दिली. या वेळी वृत्तनिवेदिका कविता राणे, चिमुरडी गिर्यारोहक शर्विका म्हात्रे यांचा सन्मान करण्यात आला. या प्रदर्शनात कोकण कृषी विद्यापीठासह विविध 100 स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. त्याचबरोबर शेती उत्पादने, अवजारे यांचे प्रदर्शन, शेतीची माहिती देणारी व्याख्याने, परिसंवाद, चर्चासत्राचे आयोजनही करण्यात आले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper