Breaking News

राजधानी दिल्लीतील पथसंचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला द्वितीय क्रमांक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारताच्या 74व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दिल्लीत कर्तव्यपथावरील पथसंचलनात सादर करण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या चित्ररथाने दुसरा क्रमांक पटकाविला आहे. प्रसिद्ध साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती या संकल्पनेवर आधारित चित्ररथ महाराष्ट्राने सादर केला होता. उत्तराखंड राज्याचा पहिला, तर उत्तर प्रदेशचा तिसरा क्रमांक आला आहे.
महाराष्ट्र ही देवदेवता, साधू-संतांची भूमी आहे. राज्याला मोठी धार्मिक परंपरा राहिली आहे. राज्यात कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुकामाता हे तीन पूर्ण शक्तीपीठे आहेत, तर वणीची सप्तश्रृंगी हे अर्धे शक्तिपीठ आहे. या शक्तिपीठांचे दर्शन दिल्लीतील पथसंलनात सर्वांना घडविण्यात आले होते.
महाराष्ट्राच्या चित्ररथाच्या पुढील दर्शनीय भागात गोंधळी संबळ वाद्य वाजवित असल्याची मोठी प्रतिकृती होती. समोरच्या डाव्या व उजव्या भागात पारंपरिक वाद्य वाजविणारे आराधी, गोंधळी यांच्या प्रतिमा होत्या. त्यामागे शक्तिपीठांची मंदिरे व त्यात देवींच्या प्रतिमा होत्या. मागच्या बाजूस पोतराज आणि हलगी वाजविणार्‍या भक्तांची मोठी प्रतिकृती, तर मधल्या जागेत लोककलाकार आराधी, पोतराज हे लोककला सादर करीत होते. शेवटी मागच्या बाजूस नारीशक्तीचे प्रतिनिधीत्व करणारी एक मोठी स्त्री प्रतिमा लावण्यात आली होती.
या चित्ररथाची संकल्पना सांस्कृतिक कार्य संचालनालयाची होती. ‘शुभ ड’ या संस्थेने चित्ररथाला मूर्त स्वरूप देण्याचे काम केले. संगीतकार कौशल इनामदार यांनी चित्ररथात साडेतीन शक्तीपीठांचा महिमा सांगणारे गीत संगीतबद्ध केले. प्राची गडकरी यांनी हे गीत लिहिले, तर व्हिजनरी परफॉर्मिंग कला समूह या संस्थेच्या कलाकारांनी या चित्ररथावर नृत्य कला सादर केली.
17 राज्यांबरोबरच संस्कृती मंत्रालय, गृह मंत्रालय (केंद्रीय सशस्त्र पोलीस दल), गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय (केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग), आदिवासी व्यवहार मंत्रालय आणि कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय (इंडियन कौन्सिल अ‍ॅग्रीकल्चर रिसर्च अर्थात भारतीय कृषी संशोधन परिषद), गृह मंत्रालय (अमली पदार्थ नियंत्रण ब्युरो) या मंत्रालयांचे आणि विभागांचे सहा चित्ररथही या परेडमध्ये सहभागी झाले होते.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply