Breaking News

महायोजना शिबिर नागरिकांसाठी लाभदायक -मुख्यमंत्री

पुणे ः प्रतिनिधी

एकाच ठिकाणी सर्व प्रकारच्या योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहचावा यासाठी महायोजनासारखी शिबिरे उपयुक्त ठरतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कोथरूड येथील महेश विद्यालय येथे महायोजना शिबिर 2019चे उद्घाटन काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, आ. प्रा. मेधाताई कुलकर्णी आदी उपस्थित होते.

ग्रामीण भागामध्ये योजनांची शिबिरे आयोजित केली जातात. शहरी भागांमध्ये अशा प्रकारच्या शिबिराचे आयोजन करून सर्वसामान्य नागरिकांना लाभ देण्यासाठी मेधाताईंनी कोथरूड भागामध्ये या शिबिराचे आयोजन केले आणि या शिबिराला एवढा मोठा प्रतिसाद मिळतोय ही आनंदाची बाब असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, प्रत्येकालाआवश्यक असलेल्या योजनांचा स्टॉल या ठिकाणी आहे. समाजातील सर्व घटकांकरिता योजना आहेत. सर्व स्टॉलवर प्रचंड गर्दी पाहायला मिळाली, यावरूनच लोकांना या शिबिराची आवश्यकता होती, मात्र  व्यवस्था नव्हती. आज या शिबिरामुळे ती व्यवस्था उभी राहिली आहे. लाखो लोकांचे कल्याण त्या माध्यमातून होणार असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या तीन ते चार वर्षात पुणे शहर सर्वोत्तम शहर असेल. पुण्याचा बदललेला चेहरा येत्या काळात नक्कीच पाहायला मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी व्यक्त केला. महायोजना शिबिराच्या माध्यमातून ज्या लाभार्थींनी योजनांसाठी अर्ज केला असेल त्यासाठी आलेल्या अडचणीची सोडवणूक करण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालय आपल्या पाठीशी राहील, असेही त्यांनी सांगितले. प्रास्ताविकात आ. मेधाताई कुलकर्णी म्हणाल्या, सर्वसामान्य नागरिकांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना आहेत. महायोजना शिबिराच्या माध्यमातून विविध योजना एकाच छाताखाली आणण्याचा प्रयत्न असून या शिबिराला मोठा प्रतिसाद मिळत आहे. महायोजना स्थळी नवीन मतदार नाव नोंदणी,  प्रधानमंत्री आवास योजना, मुख्यमंत्री सहायता निधी, शैक्षणिक व शिष्यवृत्ती योजना, संजय गांधी व श्रावण बाळ योजना, राजश्री शाहू शिष्यवृत्ती योजना,नोकरदार महिला वस्तीगृह योजना, उज्वला योजना, प्रधानमंत्री मातृवंदन योजना, माझी कन्या भाग्यश्री योजना आदी योजनाबाबत माहिती व लाभासाठी  स्टॉल लावण्यातआले आहेत. पुणे महानगरपालिकेच्या वतीने महिला बाल कल्याणकारी योजना, दिव्यांग कल्याणकारी योजना, युवा कल्याणकारी योजना, दीनदयाळ अंत्योदय  योजना  या योजनांसंदर्भात सविस्तर माहिती देणारे फलक दर्शनी भागात लावण्यात आले आहेत. योजनांची माहिती व लाभाची नोंदणी प्रक्रिया जाणून घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी महायोजना शिबिरातील स्टॉलची पाहणी करून समाधान व्यक्त केले. या वेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

रायगड बॅडमिंटन चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेचे शानदार उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून …

Leave a Reply