आमदार प्रशांत ठाकूर यांचे उत्तर रायगड महिला मोर्चाच्या बैठकीत मार्गदर्शन
पनवेल : रामप्रहर वृत्त
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदे गटाने मिशन 200चा नारा दिला आहे, तर लोकसभेसाठी मिशन 45चे लक्ष्य निश्चित केले आहे. यासाठी प्रत्येकाला भाजपसोबत जोडायचे आहे. त्यासाठी शक्य होईल तेवढा वेळ पक्षाचे काम करण्यासाठी द्या, असे आवाहन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी महिला मोर्चाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत केले.
उत्तर रायगड जिल्हा भाजप महिला मोर्चाची कार्यकारिणी बैठक सोमवारी (दि. 13) मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर समाजिक विकास मंडळाच्या सभागृहात भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि महिला मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्षा अश्विनी पाटील यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीमध्ये महिला मोर्चाच्या कार्याचा आढावा घेण्यात आला.
त्याचप्रमाणे सरल अॅप, फ्रेंड्स ऑफ बीजेपी, नवमतदार नोंदणी, जागतिक महिला दिवस, धन्यवाद मोदीजी कार्ड, सोशल मिडियाचा उपयोग तसेच येणार्या काळात राबविण्यात येणार्या कार्यक्रमांसंदर्भात चर्चा झाली. आमदार प्रशांत ठाकूर यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या माध्यमातून होत असलेली विकासकामे तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणार्या विविध योजनांची माहिती सर्वांपर्यंत पोहचवण्याचे आवाहन केले. महिला मोर्चाच्या माध्यामतून राबवण्यात येणार्या कामांचे कौतुक केले. महिला मोर्चाच्या पदाधिकार्यांनी धन्यवाद मोदीजींचे कार्ड आमदार प्रशांत ठाकूर आणि जिल्हाध्यक्षा अश्विनी पाटील यांच्याकडे सुपूर्द केले.
या बैठकीला महापालिकेच्या माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी उपमहापौर चारुशीला घरत, उरणच्या माजी नगराध्यक्षा सायली म्हात्रे, माजी नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, निता माळी, कुसूम म्हात्रे, राजश्री वावेकर, रायगड जिल्हा महामंत्री दिपक बेहरे, भटके विमुक्त आघाडीच्या जिल्हाध्यक्षा विद्या तामखेडे, जिल्हा समन्वयक संध्या शारबिंद्रे, महिला मोर्चाच्या पनवेल शहराध्यक्षा वर्षा नाईक, कामोठे महिला मोर्चाध्यक्षा वनिता पाटील, प्रिया मुकादम, गिता चौधरी यांच्यासह महिला मोर्चाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान या वेळी संध्या शारबिंद्रे यांची उत्तर रायगड महिला मोर्चाच्या जिल्हा समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.