आमदार प्रशांत ठाकूर यांनी वेधले शासनाचे लक्ष; ट्रॉमा केअर सेंटर उभारणीची मागणी
मुंबई : रामप्रहर वृत्त
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम उत्कृष्ट दर्जाने आणि लवकरात लवकर होण्याबरोबरच या महामार्गावर प्रत्येक 50 ते 100 किमी अंतरावर ट्रॉमा केअर सेंटर उभारणी झाली पाहिजे यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल केला. याद्वारे त्यांनी या महत्त्वपूर्ण विषयावर शासनाचे लक्ष वेधले.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी दाखल केलेल्या तारांकित प्रश्नात म्हटले की, मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण आणि रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम डिसेंबर 2022पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असताना या आश्वासनाची पूर्तता करण्यास एनएचएआय अपयशी ठरल्याने तसेच 12 वर्षांपासून या महामार्गाचे काम प्रलंबित असल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या या कामांबाबत उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे जानेवारी 2023मध्ये निदर्शनास आले आहे. पनवेल ते इंदापूरमधील सुरुवातीचा 0 ते 42 किमीच्या पट्टयाचे काम पूर्ण झाल्याचे प्रतिज्ञापत्र एनएचएआयने न्यायालयासमोर सादर केले असून याच मार्गादरम्यानच्या 42.3 किमी ते 84.6 किमीच्या रस्त्याचे कंत्राट देण्यात आलेल्या मेसर्स कल्याण टोल इन्फ्रा लि. या कंपनीने कोणतेही काम केलेले नाही. या महामार्गाच्या कामाची जबाबदारी ही राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाची असून काम मोठ्या प्रमाणात अपूर्ण असतानाही तसेच राज्य शासनाकडून या विषयी प्राधान्याने कोणतीही कार्यवाही होत नसतानाही या संपूर्ण टप्प्याचे काम मे 2023पर्यंत पूर्ण होईल अशा स्वरुपाचे प्रतिज्ञापत्र मुख्य सरकारी वकिल यांनी न्यायालयात सादर केले आहे तसेच या महामार्गाचे काम अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे झाले असून या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे येथे अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. असे असताना या महामार्गावर अपघातग्रस्तांना वैद्यकीय सेवा तत्काळ मिळण्याबाबत प्रत्येक 50 किंवा 100 किमी अंतरावर एक ट्रामा सेंटर उभारण्याची आवश्यकता आहे.
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून महामार्गाची प्रलंबित कामे तत्काळ पूर्ण करून निकृष्ट काम करणार्यांवर कारवाई करण्याबाबत तसेच ट्रामा केअर सेंटर उभारणीबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, असा सवाल आमदार प्रशांत ठाकूर यांनी शासनाला केला.
या प्रश्नावर राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले की, मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण आणि रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम डिसेंबर 2022पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असताना या आश्वासनाची पूर्तता करण्यास एनएचएआय अपयशी ठरल्याने तसेच 12 वर्षांपासून या महामार्गाचे काम प्रलंबित असल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या या कामांबाबत उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केल्याची बाब खरी आहे. पनवेल ते इंदापूरमधील सुरुवातीचा 0 ते 42 किमीच्या पट्ट्याचे काम पूर्ण झाल्याचे प्रतिज्ञापत्र एनएचएआयने न्यायालयासमोर सादर केले असून याच मार्गादरम्यानच्या रस्त्याचे कंत्राट देण्यात आलेल्या मेसर्स कल्याण टोल इन्फ्रा लि. या कंपनीने काम केलेले नसल्याची बाब अंशत: खरी आहे. त्या अनुषंगाने किमी 42.3 ते किमी 84.6 लांबीमध्ये असलेला दोन लेनचा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने रस्त्याचा खराब भाग डांबरीकरणाने दुरुस्त करण्याचे मंजूर असून त्या संदर्भातील कामे प्रगतिपथावर आहेत. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्या अखत्यारीत चौपदरीकरणाचे उर्वरित किमी 42 ते किमी 84 या लांबीचे काम 18 महिन्यांमध्ये पूर्ण करण्याचे नियोजन आहे व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या किमी 84/00 ते किमी 450/170 या लांबीचे काम डिसेंबर 2023पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
मुंबई-गोवा महामार्गांच्या लांबीतील पावसाळ्यात पडलेले खड्डे डिसेंबर 2022पूर्वी भरण्यात आले असून त्यानंतरही चालू कामामुळे, अवजड मशिनरी फिरत असल्याने पडलेले खड्डे व वळण रस्त्यावरील वाहतूक वर्दळीमुळे पडणारे खड्डे भरण्याचे काम नियमितपणे सुरू आहे. महामार्गावरील इंदापूर ते करोडी परशुराम घाट (किमी 84/00 ते किमी 205/400) या राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे असलेल्या लांबीमध्ये किमी 126.500 मौजे महाड येथे ट्रामा सेंटर उपलब्ध आहे तसेच भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणातर्फे खारपाडा टोलनाका येथे एक व सुकेळी घाट येथे एक रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याशिवाय अपघातग्रस्तांना वैद्यकीय सेवा तत्काळ मिळण्याबाबत प्रत्येक 50 किंवा 100 किमी अंतरावर एक ट्रामा सेंटर उभारण्याची गरज असल्याचेही मंत्री रवींद्र चव्हाण यांनी अधोरेखित केले.