पनवेल : प्रतिनिधी
खारघर नो लिकर झोन होण्याच्या दृष्टिकोनातून पनवेलचे कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी सूचना उपस्थित केली आणि या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधले.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहात खारघरचा आवाज बुलंद करताना म्हटले की, पनवेल महापालिका हद्दीमधील खारघर शहरातील अनेक नागरिकांनी सातत्याने गेल्या वर्षांपासून केलेली मागणी आणि त्या अनुषंगाने अलीकडच्या काळात नव्याने दिलेले काही परवाने या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणात नागरिकामंध्ये असंतोष आहे. खारघरमधील नागरिकांना अभिप्रेत असलेली दारूबंदी लागू करण्यासाठी शासन पुढाकार घेईल काय आणि किती कालावधीत या निर्णयाची शासन अंमलबजावणी करेल, असा सवाल या लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून आमदार प्रशांत ठाकूर यांनी केला.
राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री शंभूराजे देसाई यांनी यावर सभागृहात सांगितले की, दारूचे दुकान बंद करायचे असेल तर त्याच्यामध्ये उभी बाटली आडवी बाटली ज्याला आपण म्हणतो त्यानुसार एकूण लोकसंख्येच्या 25 टक्के लोकांनी सहीसह जिल्हाधिकार्यांकडे ती मागणी केल्यानंतर मग जिल्हाधिकारी अशा पद्धतीने मतदान घेतात. आता हे महापालिका क्षेत्र असल्यामुळे तिथे गुप्त मतदानाची पद्धत आहे, त्यालासुद्धा नियम आहे की एकूण मतदारांच्या 50पेक्षा जास्त लोकांनी मतदान केले पाहिजे. ते दारूच्या बाजूला असेल तर चालू राहील आणि दारूविरोधात असेल तर बंद होईल आणि ही विहित पद्धती या प्रकरणांमध्ये अवलंबलेली नाही जर एकूण लोकसंख्येच्या 25 टक्के लोकांनी मागणी जिल्हाधिकार्यांच्याकडे केली, गुप्त मतदान जिल्हाधिकार्यांनी घेण्याचे आदेश दिले आणि गुप्त मतदानात उभी बाटली आडवी बाटली करण्यासाठी सर्वाधिक मतदान झाले, तर निश्चितपणे विचार केला जाईल.
या उत्तरावर बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी, उत्पादन शुल्क विभागाकडून उत्तर दिले जाणार आहे, मात्र यासाठीची प्रक्रिया शासनाने अवलंबायची आहे. या संदर्भात आम्ही नागरिक, ग्रामस्थ, संघटना यांच्यातर्फे यापूर्वीच मागणी केलेली आहे. शासन या संदर्भात या मागणीचा विचार करून जिल्हाधिकारी यांच्यामार्फत यासाठीची प्रक्रिया किती कालावधीत करेल असा प्रतिसवाल केला. त्यावर मंत्री शंभूराजे देसाई यांनी तशी तरतूद नसल्याचे नमूद करीत 25 टक्के लोकांनी जिल्हाधिकार्यांकडे ती मागणी केल्यानंतर जिल्हाधिकार्यांनी अशा गुप्त पद्धतीने मतदान घेऊन विहित प्रक्रिया पूर्ण करावी त्यानुसार कार्यवाही केली जाईल, असे आमदार प्रशांत ठाकूर यांना सभागृहात आश्वासित केले.