Breaking News

पनवेल बसस्थानकाच्या पुनर्विकासासाठी आमदार प्रशांत ठाकूर आक्रमक

ठेकेदाराला 15 दिवसांचा अल्टीमेटम; प्रधान सचिव पराग जैन यांचे निर्देश

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल बसस्थानक पुनर्विकासाच्या कामासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर आक्रमक झाल्याने येत्या 15 दिवसांत बसस्थानकाच्या कामाला सुरुवात न झाल्यास ठेका रद्द करण्याचे निर्देश परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन यांनी इडयुस पार्क इंटरनॅशनल कंपनीला दिले आहेत.
परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे मुख्य अभियंता श्री. गोसावी यांच्यासोबत आमदार प्रशांत ठाकूर यांची बैठक गुरुवारी (दि. 6) मंत्रालयात परिवहन विभागाचे प्रधान सचिव यांच्या दालनात झाली. या बैठकीस महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे वास्तुविशारद निलेश लाहिवाल, परिवहन विभागाच्या कक्ष अधिकारी श्रीमती मेंडे, ठेकेदार इडयुस पार्क इंटरनॅशनल कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मुंबईचे प्रवेशद्वार व मुंबई ठाण्याहून राज्याच्या इतर भागाकडे जाणार्‍या बसेसचे प्रमुख गंतव्य स्थान म्हणून ओळखल्या जाणार्‍या पनवेल बसस्थानकाचा बांधा, वापरा, हस्तांतर करा या तत्वावर पुनर्विकास करण्याचा कामास 2016 साली मान्यता देण्यात आली. त्यानंतर सन 2018मध्ये या बसस्थानकाच्या पुनर्विकासाच्या कामासाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली होती, मात्र जवळपास सहा वर्षांपेक्षा जास्त कालावधी होऊनसुद्धा बसस्थानकाच्या पुनर्विकासाच्या कामास कोणत्याही प्रकारची सुरुवात झाली नाही. पुनर्विकासाच्या नावाखाली जुने बसस्थानक पाडून तात्पुरते शेड उभारण्यात आले आहे. सद्यस्थितीत तात्पुरत्या शेडमध्ये अनेक गैरसोयी असूनही नवीन बसस्थानकाच्या प्रतीक्षेने प्रवासी हा त्रास गेली सहा वर्षे सहन करीत आहेत. बसस्थानकाच्या पुनर्विकास कामाला तातडीने सुरुवात करून ते पूर्णत्वास नेण्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून निरनिराळी आंदोलन, बैठका तसेच विधिमंडळातही गेली अनेक वर्षे पाठपुरावा सुरू आहे. संबंधित विभागामार्फत अद्यापपर्यंत पुढील कार्यवाही न झाल्याने अखेर आमदार प्रशांत ठाकूर यांनी परिवहन विभागाला रायगड जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलनाचा निर्वाणीचा इशारा दिला होता. त्या अनुषंगाने गुरुवारी बैठक झाली.
पनवेल बसस्थानकात प्रवासीवर्गाला होणार्‍या त्रासाबद्दल या बैठकीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी आक्रमक भूमिका मांडत 2018 साली इडयुस पार्क इंटरनॅशनल कंपनीला स्वीकृतीपत्र देण्यात आले असतानाही अद्यापही काम सुरू झाले नसल्याने हा ठेका रद्द करून ताबडतोब नवीन ठेकेदाराची नियुक्ती करून बसस्थानकाच्या विकासाच्या कामाला सुरुवात करण्याची आग्रही मागणी केली. नव्या बांधकाम नियमावलीमुळे (यूडीसीपीआर) अतिरिक्त बांधकाम करावे लागत असल्याने आर्थिक नुकसान होत असल्याची तक्रार ठेकेदाराने केली. त्यावर या संदर्भामध्ये नियमांचे पालन करूनच काम करावे, लागेल असे निर्देश ठेकेदाराला प्रधान सचिव सचिव पराग जैन यांनी दिले. त्या अनुषंगाने जैन यांनी तातडीने कार्यवाही होण्यासाठी येत्या 15 दिवसांचा अल्टीमेटम संबंधित ठेकेदार इडयुस पार्क इंटरनॅशनल कंपनीला दिला आहे.
पनवेल एसटी बसस्थानकाचा वापर सर्वसामान्य गोरगरीब माणूस दैनंदिन कामासाठी करीत असून त्याला अनेक हाल अपेष्टांना सामोरे जावे लागत आहे. या संदर्भामध्ये ठेकेदाराला यापुढे एकही दिवसाची मुदत देऊ नये, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी केली. ही मागणी प्रधान सचिव पराग जैन यांनी मान्य केली असून पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनाही या कंत्राटाचे आराखडे मंजूर करण्यासंदर्भात सूचना केल्या असल्याचे नमूद केले. त्यामुळे या महत्त्वपूर्ण बैठकीमुळे आता बसस्थानकाच्या पुनर्विकासाच्या कामाला लवकरच सुरुवात होईल अशा अपेक्षा निर्माण झाल्या आहेत.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply