Breaking News

शेकापचा माजी नगरसेवक सुनील बहिराच्या पोलीस कोठडीत वाढ

पनवेल : रामप्रहर वृत्त
प्रॉपर्टीसाठी मयत वडिलांचे खोटे शपथपत्र बनवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी पनवेल तक्का येथील शेकापचा माजी नगरसेवक सुनील गोविंद बहिरा यास पनवेल पोलिसांनी गजाआड केले असून गुन्ह्याचे गंभीर स्वरूप पाहता न्यायालयाने अधिक चौकशीसाठी त्याला 28 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. आता या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्यात आली आहे.
शेकापचा माजी नगरसेवक सुनील बहिरा याने सन 1997मध्ये बोगस कागदपत्रांच्या आधारे तत्कालीन पनवेल नगर परिषदेकडून अंतिम भूखंड क्रमांक 1633 ब आणि 1637वर इमारत बांधकाम परवानगी मिळवलेली आहे. हे दोन्ही भूखंड हे सुनील बहिरा यांचे वडील कै. गोविंद काथोर बहिरा यांच्या मालकीचे होते. गोविंद बहिरा यांचे निधन 17 नोव्हेंबर 1977 रोजी झालेले आहे. असे असताना सुनील बहिरा याने मयत वडिलांच्या जागी तोतया व्यक्ती उभा करून पनवेल कार्यकारी दंडाधिकारी यांच्यासमोर 20 रुपयांच्या स्टॅम्पवर शपथपत्र केलेले आहे
कै. गोविंद बहिरा हे सन 1977मध्ये मयत झालेले असताना प्रॉपर्टीसाठी सुनील बहिरा याने 1997 साली त्यांच्या नावाने शपथपत्र केले असून वडिलांचा खोटा अंगठा स्टॅम्पवर मारून मयत व्यक्तीला जिवंत दाखवत बांधकाम परवानगी मिळवली होती. अशा प्रकारे शासनाची फसवणूक केल्याबद्दल विशाल पगडे यांनी पोलिसांकडे दाद मागितली. मागील महिन्यात दाखल झालेल्या गुन्ह्याचा पाठपुरावा त्यांनी केल्याने अखेर सुनील बहिरावर भा.दं.वि. कलम 417, 465, 467, 468, 471 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी सुनील बहिरा यास 24 नोव्हेंबर रोजी पनवेल न्यायालयात हजर केले असता गुन्ह्याचे गंभीर स्वरूप लक्षात घेता न्यायालयाने अधिक तपासासाठी त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली.
सुनील बहिराच्या पोलीस कोठडीची मुदत मंगळवारी (दि.28) संपत असल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. या वेळी न्यायालयाने सविस्तर चौकशीसाठी आरोपीच्या कोठडीत आणखी तीन दिवस म्हणजे 30 नोव्हेंबरपर्यंत वाढ केली आहे.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply