Breaking News

खारघरमधील अश्वमेध महायज्ञाला भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, उपमुख्यमंत्री फडणवीस यांची उपस्थिती

खारघर : रामप्रहर वृत्त
महाराष्ट्र ही विरांची आणि संतांची तसेच ज्योतिर्लिंग आणि शक्तिपीठ असलेली भूमी आहे. या भूमीत वैश्विक शांतीसाठी महा यज्ञ आयोजित करण्यात आला आहे. गायत्री परिवाराने यज्ञ परंपरेला वैश्विक महत्त्व प्राप्त करून दिले आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खारघरमध्ये केले. खारघरमध्ये सुरू असलेल्या भव्य अश्वमेध यज्ञाच्या दुसर्‍या दिवशी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सपत्नीक होम हवन करत भारताच्या उज्वल भविष्याची कामना केली.
अखिल विश्व गायत्री परिवाराच्या वतीने खारघरमध्ये पाच दिवशीय अश्वमेध महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी (दि. 22) दुसर्‍या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित राहून देवावाहन, देवदर्शन घेतले. तसेच महायज्ञात सहभागी होऊन यज्ञ अग्नीमध्ये आहुती दिली. या वेळी भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा,
डॉ. मल्लिका नड्डा, गायत्री परिवाराचे संस्थापक श्रद्धेय शैलबाळा पंड्या, डॉ. चिन्मय पंड्या, भाजपचे राष्ट्रीय संघटनमंत्री शिवप्रकाश, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, कौशल्य व रोजगार कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, मंदा म्हात्रे, प्रशांत ठाकूर, जिल्हाधिकारी किशन जावळे, गीतकार समीर, गायक शंकर महादेवन, संगीत आणि गायक हिमेश रेशमिया आणि अभिनेता सुनील लहिरी यासह इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताचे स्वप्न पाहिले आहे. यामध्ये विकसित सांस्कृतिक योगदानामध्ये गायत्री परिवाराचे सर्वाधिक योगदान असेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी व्यक्त केला. ही सनातन, यज्ञ संस्कृती विज्ञानाधिष्टीत असून विश्व शान्ति तसेच सदाचारी वर्तनासाठी जागतिक पातळीवर पोहोचविण्याचे काम गायत्री परिवार करीत आहे.
हम बदलेंगे तो देश बदलेगा हा आपला मंत्र आहे. गायत्री परिवाराने नशामुक्तते साठी विशेष अभियान हाती घेतले आहे. विश्वकल्याणसाठी गायत्री परिवाराचे अमूल्य योगदान असल्याचेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी सांगितले.
या अश्वमेध यज्ञात सहभागी सर्वांनी या वेळी पर्यावरण संरक्षण, महिला सबलीकरण, अंमली पदार्थ मुक्त जग, मानव कल्याण, सहकार्य-संघटन आणि मजबूत राष्ट्र उभारणीसाठी संकल्पनेचा संकल्प केला.
‘नशामुक्त समाज निर्माणाकडे वाटचाल’ 
आज नवी मुंबईत आयोजित ’अश्वमेध गायत्री महायज्ञ’मध्ये सहभागी होण्याचे सौभाग्य मला लाभले. योग, आयुर्वेद, वनौषधी इत्यादींचा प्रसार करून नशामुक्त समाज निर्माण करण्याचे हे दिव्य आयोजन प्रभावी माध्यम ठरेल. समाज, संस्कृती आणि वारशाला समर्पित या भव्य-दिव्य कार्यक्रमासाठी मी गायत्री परिवाराचे आभार मानतो, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी या कार्यक्रमात म्हटले.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply