पनवेल : रामप्रहर वृत्त
प्रत्येक कार्यकर्ता एकरूप होऊन काम करणार आहे, त्यामुळे महासंसदरत्न खासदार श्रीरंग बारणे यंदाच्या निवडणुकीत किमान तीन लाखांच्या मतांची आघाडी घेऊन विजयी होतील, असा विश्वास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 2) येथे व्यक्त केला. मावळ लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार व विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी मंगळवारी पनवेल येथे भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. या वेळी झालेल्या छोटेखानी बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष अनिल भगत, महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, प्रकाश बिनेदार, श्रीनंद पटवर्धन, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, चंद्रशेखर सोमण, रमेश गुडेकर, प्रथमेश सोमण यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी उपस्थित होते.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पुढे बोलताना सांगितले कि, येथील काम फक्त निवडणुकीपुरता नाही तर वर्षाचे बाराही महिने अविरतपणे चालते आणि त्या अनुषंगाने कार्यकर्ता सज्ज असतो. त्यामुळे बिनधास्त रहा, या वेळी मागील निवडणुकीपेक्षा जास्त मताधिक्य मिळवून देऊ, असेही त्यांनी आश्वासित केले. लोकसभेचा सदस्य म्हणून खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून कामे केली, जनसंपर्क वाढवला त्यामुळे कामाचा खासदार म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. घाटमाथ्याहून तुम्ही मताधिक्य घेऊन येणार आणि त्यामध्ये आमच्याकडून मतांची जास्त आघाडी देणार असून एकूणच तीन लाखांपेक्षा जास्त मतांच्या फरकाने खासदार श्रीरंग बारणे निवडून येणार आहेत आणि हा महाराष्ट्रातील सर्वात चांगला निकाल असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
खासदार श्रीरंग बारणे यांनी आपल्या मनोगतात, या परिसरात मागील निवडणुकीत माझ्या निवडणुकीची धुरा लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांभाळली आणि मतांची आघाडी मिळवून विजयी केले. त्यामुळे पुन्हा एकदा या विभागातून मताधिक्य मिळेल यात तिळमात्र शंका नसल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना विविध योजना विकासकामे अंमलात आणली. सरकारची कामे लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाने देशाला जगात मानाचे स्थान मिळवून दिले, त्यामुळे पुन्हा एकदा मोदी सरकार ही देशाची गरज आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून आमदार प्रशांत ठाकूर यांनी या ठिकाणी विकासाचा आलेख उंचावला त्यामुळे त्यांच्या कामातून मतांची आघाडी मिळेल, असेही त्यांनी या वेळी अधोरेखित केले.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी बोलताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षांत केलेले काम सर्वसामान्य नागरिकापर्यंत पोहचविण्याचे काम कार्यकर्त्यांनी केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नरेंद्र मोदीजी पंतप्रधान होणार असून मोदींची गॅरंटी प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपण स्वतः उमेदवार आहोत असे समजून काम करा, असे आवाहन केले. तसेच मागील वेळी पनवेल विधानसभा मतदार संघातून 56 हजार मतांची आघाडी दिली होती ती या निवडणुकीत दुप्पटीने देणार असल्याचेही त्यांनी या वेळी नमूद केले.
या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी प्रास्ताविकात म्हटले कि, पुन्हा एकदा प्रचंड मतांनी विजयी करायचे आहे आणि त्यासाठी कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. बुथ स्तरावर बैठका आणि त्या अनुषंगाने काम करण्यात आले आहे. अब कि बार 400 पार हा नारा सर्वांच्या नसानसात भिनला आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली जास्तीत जास्त मते मिळवण्याचा प्रयत्न असणार असून प्रत्येक कार्यकर्ता झोकून काम करणार आहे.
Check Also
राज्यस्तरीय 11व्या अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन
विजेत्या एकांकिकेला एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ …