पनवेल : रामप्रहर वृत्त
नवीन पनवेल येथील आदई सर्कल येथील मैदानात पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या बहुप्रतीक्षित दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमीचे काम पूर्ण झाले असून लवकरच मान्यवरांच्या हस्ते या अकादमीचे उद्घाटन होणार आहे. या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी गुरुवारी महापालिकेच्या अधिकार्यांसोबत या मैदानाची पाहणी केली आणि आवश्यक त्या सूचना दिल्या.
या पाहणीदरम्यान माजी नगरसेवक अनिल भगत, समीर ठाकूर, भाजपचे नवीन पनवेल मंडळ अध्यक्ष दशरथ म्हात्रे, पनवेल शहर मंडळ अध्यक्ष सुमित झुंझारराव, महिला मोर्चाच्या पनवेल शहर अध्यक्षा राजश्री वावेकर, किशोर चौतमोल, मयूर आंग्रे आणि महापालिकेचे अधिकारी संजय कटेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी अधिकार्यांकडून अकादमीमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती घेतली. खेळाडूंच्या सरावासाठी तयार करण्यात आलेली खेळपट्टी, नेट प्रॅक्टिसची व्यवस्था आणि इतर आवश्यक पायाभूत सुविधांचा आढावा घेतला. या क्रिकेट अकादमीमध्ये आधुनिक प्रशिक्षण सुविधा, उत्तम दर्जाची खेळपट्टी आणि खेळाडूंसाठी आवश्यक असणार्या इतर सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळे पनवेल परिसरातील युवा क्रिकेटपटूंना उच्च दर्जाचे प्रशिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे.
Check Also
पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …
RamPrahar – The Panvel Daily Paper